भुसावळातील दोन वर्षीय बालिकेचा श्वान दंशाने मृत्यू

भुसावळ :  शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी असलेल्या विधी राकेश कुरकुरे (वय 2) या बालिकेचा श्वान दंशाने बुधवारी दुपारी मृत्यू झाला. बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी झाला होता श्वानदंश
शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी विधी कुरकुरे या चिमुकलीस सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी मोकाट कुत्र्याने डोक्याला चावा घेतला होता. त्यावेळी याच परीसरातील चार जणांनाही आणि अन्य पाच ते सात जणांना श्वान दंश झाला होता. दरम्यान, जखमी अवस्थेतील विधीवर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले व बरे वाटू लागल्याने तिला घरी सोडण्यात आले होते मात्र विधीला पुन्हा त्रास सुरू झाल्याने तिला पुन्हा जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक खालावल्याने औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी शनिवार, 18 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांनाच या बालिकेचे बुधवारी दुपारी 3.15 वाजता निधन झाले.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला असून रात्री दहानंतर शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळातून जाणार्‍या नागरीकांच्या व वाहनधारकांच्या गाडीमागे कुत्रे लागत असल्याने पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे.