भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील एका डॉक्टर दाम्पत्याचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश करीत 10 लाख 30 हजारांच्या रोकडसह 60 हजार रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना 24 मे ते 1 जून दरम्यान घडली होती. या प्रकरणी डॉक्टरांच्या पत्नीने शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या घरफोडीचा उलगडा केला असून दोघा आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी चार आरोपी असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 86 हजार 400 रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोघा आरोपींना अटक
आकाश सुरेश मोरे (25, रा.घोडे पीर नगर, भुसावळ) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच दोन लाख 86 हजार 400 रुपयांची रोकड तसेच संशयीत आरोपी शेख दाऊद शेख महेमूद याचे वडील शेख महेमूद शेख इमाम (60, रा.दिनदयाळ नगर, भुसावळ) यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 79 हजार 900 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दोघा आरोपींना तपासाकामी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अन्य चौघा आरोपींचा कसून शोध सुरू
या घरफोडीत आरोपी आकाश मोरे सोबत शेख दाऊद शेख महेमूद (रा. दीनदयाळ नगर, भुसावळ), अनिस शेख रशीद (रा.जाम मोहल्ला, भुसावळ), अल्तमस शेख रशीद (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) व जहीर (रा .मुस्लिम कॉलनी, भुसावळ, पूर्ण नाव माहीत नाही) यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र का.पाटील, हवालदार अनिल इंगळे, रमेश चौधरी, युनूस शेख, संतोष मायकल, रणजीत जाधव, राजेंद्र पवार यांनी केली.