भुसावळातील नायब तहसीलदारांसह लिपिक कोठडीत रवानगी
बनावट आदेशान्वये निघालेल्या 11 आदेशातील व्यवहारांची चौकशी
भुसावळ : शहरातील जनकल्याण अर्बन संस्थेचे प्लॉट विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी परस्पर विक्री केल्या प्रकरणी या प्रकरणात अटक केलेले नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व शाम तिवारी यांची पोलिस कोंठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे नायब तहसीलदार इंगळे व लिपीक तिवारी यांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.
‘ते’ 11 आदेश बनावटच : व्यवहारांची होणार चौकशी
जनकल्याण अर्बनच्या प्रकरणात पोलिसांना तहसीलदारांच्या आदेशान्वये 14 पत्र निर्गमीत झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तहसील प्रशासनाला लेखी पत्र पत्र देवून या आदेशांबाबत विचारणा केली होती. प्रत्युत्तरात तहसील प्रशासनाने 11 निर्गमीत झालेले आदेश (भुसावळ तहसीलदारांच्या आदेशाचे) हे बनावट असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशान्वये निघालेल्या बनावट आदेशान्वये 11 पत्रांचा कुठल्या व्यवहारांसाठी वापर करण्यात आला, हे आदेश काढण्यात कुणाकुणाची भूमिका महत्वाची आहे शिवाय या व्यवहारांमध्ये शहरातील कोणता भूमाफियाचा समावेश आहे याबाबीकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष वेधत तपासाला वेग दिला आहे.
तलाठ्यांसह सर्कलवरही लवकरच कारवाई
भुसावळातील जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी भुसावळ तहसीलदारांचे आदेशाचे बनावट सही व शिक्का याचा वापर करीत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केल्यानंतर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्या दहा जणांविरूध्द येथील शहर पाोलिस ठाण्यात रविवार, 17 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी तलाठ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणांमध्ये तलाठ्यांसह सर्कलांची भूमिका ही महत्त्वाची असल्याने त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांनी इंगळे व तिवारी यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना रात्री सबजेलला रवाना करण्यात आले.