भुसावळातील निखील राजपूतची पोलिसांनी काढली ‘धिंड’

अटकेप्रसंगी पोलिसांशी संशयीताने धक्काबुक्की केल्याने पोलिस कर्मचारी जखमी : टोळीविरोधात नागरीकांच्या तक्रारी असल्यास पुढे येण्याचे आवाहन : कुटुंबियांविरोधात दाखल झाला गुन्हा

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण करणार्‍या व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात निखील राजपूतच्या बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी श्रीराम नगरातून मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताने अटकेप्रसंगी पळून जाण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना पुन्हा विरोध केल्याने त्याच्यासह कुटुंबियांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, पोलिसांनी संशयीत निखील राजपूतची राहत्या घरापासून धिंड काढत त्यास बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. नागरीकांसह व्यापारीवर्गाची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी यावेळी झाली होती.

पोलिस उपनिरीक्षकाला केली होती मारहाण
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड हे रात्र गस्तीवर असताना श्रीराम नगरातील हनुमान मंदिराजवळ दोन विना क्रमांकाच्या दुचाकीसह एक पांढर्‍या रंगाची झायलो दिसल्याने त्यांनी उभ्या असलेल्या संशयीताला नाव विचारले असता त्याने निलेश ठाकूर नाव असल्याचे सांगितले तर याचवेळी पाच ते सहा संशयीत तेथे जमले व निखील राजपूत याने मी उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अध्यक्ष असून माझ्यामागे राजकीय गॉडफादर असून माझे काही वाकडे होणार नाही, असा दम भरला तर निलेश ठाकूर व आकाश पाटील याने एक मर्डर किया है, एक और करेंगे, असे सांगत संघटीत टोळीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निखील राजपूतने तू नवीन अधिकारी आहे, नवीनसारखा रहा, असे सांगत मानेला दाबण्याचा प्रयत्न करीत उपनिरीक्षकांना मारहाण केली होती व माझ्याजवळील पिस्टलने तुला मारून टाकेल, अशी धमकीही दिली होती शिवाय नकूल राजपूत याने शिविगाळ केली होती.

यांच्या विरोधात दाखल आहे गुन्हा
या गंभीर घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर व अन्य एका अनोळखीविरोधात भाग पाच, गुरनं.307, 353, 332, 143, 147, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील पाच आरोपींना गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली तर निखील राजपूतसह अभिषेक शर्मा व अन्य संशयीत पसार झाला होता. निखील घरी आल्याची माहिती सोमवारी मिळाल्यानंतर त्यास सकाळी अटक करण्यात आली.

पोलिसांनी काढली गुन्हेगाराची धिंड
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. शहरातील श्रीराम नगरातून सोमवारी सकाळी निखील राजपूतला अटक केल्यानंतर त्याने शासकीय वाहनात बसण्यास नकार दिल्याने त्यास घरापासून पायीच बाजारपेठ पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर नागरीकांची मोठी गर्दी जमली होती.

पोलिस उपअधीक्षक म्हणाले ; टोळीविरोधात तक्रारी असल्यास पुढे यावे
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, निखील राजपूतसह टोळी विरोधात शहरातील नागरीकांची फसवणूक झाली असल्यास धमकावून प्रॉपर्टी बळकावण्यात आली असल्यास नागरीक व व्यापार्‍यांनी पुढे आल्यास तक्रारी दाखल केल्या जातील. संशयीत निखील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंत त्याच्याविरोधात 14 तर आजअखेर एकूण 16 गुन्हे दाखल असून शरीराविरोधात ईजा केल्याच्या गुन्ह्यांचा अधिक समावेश आहे.

धिंड काढली नव्हे तर पायीच आणले पोलिस ठाण्यात
वाघचौरे म्हणाले की, निखील राजपूतला पकडण्यासाठी पोलिस पथक गेल्यानंतर त्याने घराच्या गच्चीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिस पथकाला अरेरावी करून दमदाटी करीत शासकीय कामकाजात अडथळा आणला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी आडकाठी आणल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पकडताना बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत सोनार हे जखमी झाले असून त्यांच्या पोटात ईजा झाल्याने त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

यांनी केली कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, महिला कर्मचारी चौधरी, सीमा चौधरी, आशा बाविस्कर, वनिता बाविस्कर, साबळे, राजेश पाटील, गणेश चौधरी, यासीन पिंजारी, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली.

धमकावणार्‍यांविरोधात व्यापारी व डॉक्टरांनी पुढे यावे
भुसावळ शहरातील डॉक्टर्स व व्यापारी यांच्याकडे काही लोक त्यांचे माणसे पाठवत असून त्या माध्यमातून पैशांची मागणी करीत असून हा प्रकार खंडणीत मोडत असल्याने नागरीकांनी, व्यापार्‍यांनी वा डॉक्टरांनी न घाबरता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगार शहराबाहेर ठेवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून टोळींच्या हद्दपारीचेही प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.