भुसावळातील निखील राजपूतसह सात जणांच्या टोळीवर ‘मोक्का’
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले आदेश : जामीन रद्दनंतर पोलिस करणार कारवाई
भुसावळ : पोलिसांच्या दप्तरी हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद असलेल्या निखील राजपूतसह टोळीतील सात सदस्यांविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) प्रस्ताव मंजूर झाला आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीताचे जामीन रद्द केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आयजींनी दिली प्रस्तावाला मंजुरी
पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी चर्चेत आलेले करणी सेनेचे पदाधिकारी निखील राजपूत यांच्याविरूध्द पोलिसांनी मोक्काचा (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) प्रस्ताव तयार करून तो नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची डीवायएसपी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे चौकशी होऊन हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे गेला. त्यांनी यावर चौकशी करून निखील राजपूत व त्याच्या सोबतच्या सहा साथीदारांविरूध्द मोक्का कलमान्वये कारवाई केली. याबाबतचे आदेश येथील स्थानिक पोलिस प्रशासनाला प्राप्त झाले आहे. शहरात मोक्का विरूध्द कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निखील राजपूत व त्यांच्या टोळीतील सदस्यांवर हीी कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयात जामीन रद्दसाठी अर्ज
विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश काढले असल्याने राजपूत व त्यांचे साथीदार हे पोलिसांवरील हल्याच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर असल्याने त्यांचे जामीन रद्द करण्यात यावे, या आशयाचा अर्ज पोलिस प्रशासनाकडून न्यायालयात देण्यात आला आहे.
भुसावळातील गुन्हेगारांविरोधात अशीच धडक कारवाई होणार : आयजी
भुसावळ शहरातील गुन्हेगारी कायद्याचा आधार घेऊन मोडीत काढली जाणार आहे. त्यासाठी पोलिस अधिकार्यांना सूचना केल्या आहे. अजून काही जणांच्या विरूध्द मोक्का लावता येईल का, याची चाचपणी केली जाणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील म्हणाले.