भारीपाच्या ईशार्यानंतर मुख्याधिकार्यांची पाहणी ; कामांचे आश्वासन
भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील पंचशील नगरात असलेल्या विविध समस्यांबाबत भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना निवेदन दिले होते व समस्या न सोडविल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी आपल्या सहकार्यांसह मंगळवारी प्रभाग क्रमांक 18 मधील समस्यांची पाहणी करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
मूलभूत सुविधा पुरवण्याची ग्वाही
पंचशील नगरातील महिलांसह पुरूष शौचालयाची दुरवस्था झाल्याने महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते तसेच प्रभागातील गटारींची तसेच नाल्याची गेल्या अनेकदिवसांपासून साफ-सफाई न झाल्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. महिलांसह पुरूष शौचालयांची दुरुस्ती करून सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच या भागातील नाल्यांची दररोज साफसफाई करावी, अशी मागणी भारीपा बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह देवदत्त मकासरे, उषाबाई सुरवाडे, ताराबाई कांडेलकर, शरीफाबी पिंजारी, सुरेखा अडकमोल यांनी प्रसंगी केली. लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी प्रभागाच्या पाहणीप्रसंगी दिले.