महिलाही भाजली : आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने 50 हजार रुपयांचे नुकसान
भुसावळ- शहरातील रेल्वेच्या पंधरा बंगला भागातील रेल्वे कर्मचार्याच्या घरात स्टोव्हचा भडका झाल्याने घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. आगीची झळ घरातील महिलेलादेखील बसल्याने त्यादेखील भाजल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. घरातील कपडे-लत्ते, धान्य, फर्निचर, पाण्याची टाकी तसेच अन्य संसारोपयोगी साहित्य जळाल्याचे सांगण्यात आले. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
स्टोव्हचा भडका झाल्याने लागली आग
रेल्वेत पॉईंटसमन असलेले मुकेश दशरथ भालेराव पंधरा बंगला भागातील क्वार्टर क्रमांक आर.बी.883 मध्ये राहतात. शनिवारी सकाळी त्यांच्या घरातील स्टोव्हने भडका घेतल्यानंतर घरामागील कपडे-लत्त्यांनी पेट घेतला तर घरात रॉकेलचा साठा असल्याने आग अधिकच धुमसल्याने घरातील किंमती वस्तूंसह संसारोपयोगी वस्तूंची राख-रांगोळी झाली. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिल्यानंतर एका बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तो पर्यंत अनेक वस्तूंचा कोळसा झाला होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आर.के.सिंग, एस.आय.रोशन सिंह, एस.आय.जी.बी.उसर आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, भालेराव कुटुंबियांनी रॉकेलचा साठा असल्याची माहिती दिली असलीतरी घटनास्थळी डिझेलप्रमाणे सर्वत्र वास येत असल्याने विविध चर्चांना उधाणदेखील आले होते.