भुसावळ : वाढदिवसाचे लावलेले बॅनर फाडल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी बंटी पथरोडसह अन्य संशयीतांनी एकास धमकावत त्याचे चारचाकीतून अपहरण केले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात 10 सप्टेंबर रोजी बंटी पथरोडसह अन्य सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयीतांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर अटक करण्यात आली. नितीन वसंत तायडे (अंजाळे, ता.यावल) व हर्षल सुनील पाटील (वाल्मीक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
खंडणीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
शहरातील बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर फाडल्याच्या आरोपातून तक्रारदार मयुर मदन काळे (19, साकेगाव) यांचे संशयीतांनी चारचाकीतून अपहरण केले होते व चॉपर व पिस्टलचा धाक दाखवून पाच लाख रुपये देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. 7 व 8 सप्टेंबर रोजी बर्हाटे पेट्रोल व जॉली पेट्रोल पंपामागे ही घटना घडली होती. या घटनेप्रकरणी बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.भुसावळ), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई (28, भोईनगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुरूवातील सागर भोई यास अटक करण्यात आली तर बुधवारी नितीन तायडे व हर्षल पाटील यांना अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार रवींद्र बिर्हाडे, नाईक विकास सातदिवे, नाईक उमाकांत पाटील, नाईक निलेश चौधरी, नाईक रमण सुरळकर, नाईक बंटी कापडणे, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश माळी आदींच्या पथकाने केली.