भुसावळातील पेट्रोल पंपावर चिमुकल्यांचा मृत्यू : दोघा आरोपींना अटक

0

भुसावळ : जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजात विद्युत करंट उतरल्याने खेळण्यासाठी आलेल्या दोघा भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंपाचे संचालक व मॅनेजर प्रीतम कार्डा व सोनू कार्डा यांना गुरुवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

करंट लागल्याने दोघा भावंडाचा झाला होता मृत्यू
जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावरील कारंजात दीपक शंकर राखुंडे (वय 12) व गणेश शंकर राखुंडे (वय 10) हे भावंडे शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या खेळत असताना कारंजात विद्युत प्रवाह उतरल्याने दोघा भावंडाचा मृत्यू ओढवला होता तर अन्य एक बालिका सुदैवाने बचावली होती. धुळ्यातील भावंडे भुसावळ येथील आजोंबाकडे आली असतानाच ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणी दोघा चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी शिवा धर्मा हातागडे यांच्या फिर्यादीनुसार पेट्रोल पंप संचालक व मॅनेजर प्रीतम कार्डा व सोनू कार्डा यांच्याविरुद्ध शनिवारी रात्री भादंवि 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना घटनेच्या पाच दिवसानंतर गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहेत.