भुसावळातील प्रभाग 18 मध्ये मुख्याधिकार्‍यांनी केली अस्वच्छतेची पाहणी

0

तक्रारीची गांभीर्याने दखल : स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रंमाक 18 मध्ये मोठ्या प्रमाणातील अस्वच्छतेमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याची तक्रार जनाधारच्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती.त्यानुसार नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी या प्रभागाची पाहणी करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही प्रसंगी दिली.

तक्रारीची दखल घेत मुख्याधिकार्‍यांनी केली पाहणी
शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गंगाराम प्लॉट, गौतमनगर, कोलते गल्ली आदी रहिवाशी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे तसेच या भागातील नालेसफाईचे कामही अपूर्णावस्थेत करण्यात आल्याने सांडपाण्याच्या नाल्यातील पाण्याचा निचरा योग्य होत नसल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेवून नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी शुक्रवारी या प्रभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील प्रत्येक भागातील स्वच्छतेला प्रामाणिकपणे प्राधान्य दिले जाईल व भुसावळ शहर सुंदर व स्वच्छ करूनच जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेविका मीनाक्षी धांडे, नितीन धांडे व परीसरातील नागरीक उपस्थित होते.

नागरीकांना दिलासा
प्रभागातील अस्वच्छतेबाबत नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रार करताच मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांनी स्वत पाहणी केलीव स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितल्याने नागरीकांना दिलासा मिळाला. काही नागरीकांनी समस्यांबाबत मुख्याधिकार्‍यांकडे गार्‍हाणे मांडले.