भुसावळातील प्रभाग 23 च्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ

शिशिर जावळे यांचा आरोप : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

भुसावळ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी प्रभाग क्रमांक 23 च्या प्रारूप मतदार यादी व लोकसंख्येत प्रचंड घोळ असल्याचा आरोप करीत संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी यासाठी यांनी केंद्रीय व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

दोषींवर कारवाईची मागणी
पालिका निवडणूक यंत्रणेने प्रभाग रचना व या लोकसंख्येला अनुसरून आरक्षण जाहीर करताना आवश्यक असणारी प्रभाग क्रमांक 23ची 7 हजार 760 एवढी संख्या निर्धारित करून ग्राह्य धरली होती. त्यानुसार या प्रभागाची आरक्षण सोडत काढली होती. मात्र, प्रारूप मतदार याद्यांमध्ये ही संख्या वाढून 8 हजार 459 एवढी दर्शवली आहे. सदर प्रभाग क्रमांक 23 मध्ये प्रशासनाने निर्देशित व कायम केलेल्या सिमेबाहेरील प्रभागातील गौतम नगर, गंगाराम प्लॉट, साधना नगर, महालक्ष्मी परिसर खडका रोड ग्रीन पार्क 32 खोली, राजेंद्र प्रेस परिसर, लेंडी पुरा, साई कॉलनी, सुहास नगर, सुरभी नगरातील काही भाग, नेब कॉलनीतील काही भाग, महाराणा प्रताप हायस्कूल मागील परीसर, म्युनिसिपल हायस्कूल मागील परीसर, म्युनिसिपल स्टॉप कॉलनी, हुडको कॉलनी जामनेर रोड इंदिरानगर, जय रामवाडी बंब कॉलनीमागील परीसर, राजस्थान मार्बल जवळील फुले नगर, नाहाटा कॉलेज व इतर काही भागांमधील जे प्रभाग क्रमांक 23 मध्ये समाविष्ट नाहीत, अशा शेजारी प्रभागातील मतदार याद्या व मतदारांना समाविष्ट केले आहे. या नियमबाह्य मतदार याद्या व त्यातील घोळ त्वरीत मिटवावा, दुरुस्ती करावी आणि जबाबदार अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जावळे यांनी केंद्रीय व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे.