नवीन केंद्रावर जाण्यासाठी मतदारांची एक किलोमिटरची पायपीट
भुसावळ- शहरात निवडणूक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रणरणत्या उन्हात मतदारांना तब्बल एक किलोमीटर अंतर पायपीट करीत मतदान केंद्र गाठावे लागल्याने चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला तर प्रशासनाच्या कारभाराविषयी लेखी तक्रारही करण्यात आली. शहरातील यादी भाग क्रमांक 124 मधील गौसिया नगर आणि परीसरातील मतदारांचे मतदान केंद्र हाजी अजिज पहेलवान गर्ल्स उर्दू हायस्कूल (नॅशनल उर्दू गर्ल्स हायस्कूल, इमलीपूरा) या मतदान केंद्र देण्यात आले होते शिवाय तशा मतदारांना चिठ्ठ्या प्रशासनाकडून देण्यात आल्या होते मात्र प्रशासनाने हे मतदान केंद्र खडका रोडवरील उसामा उर्दू हायस्कूलमध्ये हलविले व त्याविषयी सोमवारी रात्री बीएलओ यांनी या भागात येवून तोंडी माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र मतदारापर्यंत ही माहिती न पोहोचल्याने दुसर्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावर मतदार पोहोचल्यानंतर त्यांना येथून मतदान केंद्र हलवण्यात आल्याचे कळाल्याने त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. या भागातील मतदारांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे लेखी तक्रार देवून प्रशासनाचे धिंडवडे काढले.
प्रशासनाकडे केली लेखी तक्रार
शहरातील यादी भाग क्रमांक 124 मधील गौसिया नगर आणि परिसरातील मतदारांचे मतदान केंद्र नॅशनल स्कूलमधील दक्षिणेकडील पूर्व- पश्चिम इमारत पूर्वेकडून खोली क्रमांक 1 असा उल्लेख होता. याबाबत मतदारांना चिठ्ठ्या वाटप करण्यात आल्या होत्या मात्र या ठिकाणी मतदार पोहोचल्यानंतर त्यांचे मतदान उसामा उर्दू हायस्कूल, खडकारोड येथील मतदान केंद्रावर वळविण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे या केंद्रावरील तब्बल एक हजार 200 मतदारांना एक किलोमिटरची पायपीट करून भर उन्हात उसामा उर्दू हायस्कूल गाठावे लागले. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला. याबाबत मतदार निता पाटील, रसिकलाल देशमाने, ममता पासी, रमेश कनोजे, कविता कापडे, अनिता पारधे, सारिका बडगे, गिताबाई बडगे, उमा परदेशी, राजू खरात आदी मतदारांनी याबाबतची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, रावेर लोकसभा मतदार संघ यांच्याकडे नोंदवली मात्र या सर्व प्रकरणी प्रशासनाने मात्र कानावर हात ठेवले आहेत.