भुसावळ : वाढदिवसाचे लावलेले बॅनर फाडल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी बंटी पथरोडसह अन्य संशयीतांनी साकेगावातील तरुणाला धमकावत त्याचे चारचाकीतून अपहरण केले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गत वर्षीय 10 सप्टेंबर 2021 रोजी बंटी पथरोडसह अन्य सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती तर बंटी पथरोडसह अन्य तिघे पसार होते.
संशयीताला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
मंगळवारी भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर बंटी पथरोड यास अटक करण्यात आली. आरोपीस बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खंडणी प्रकरणी दाखल होता गुन्हा
शहरातील बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर फाडल्याच्या आरोपातून तक्रारदार मयुर मदन काळे (19, साकेगाव) यांचे संशयीतांनी चारचाकीतून अपहरण केले होते व चॉपर व पिस्टलचा धाक दाखवून पाच लाख रुपये देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गतवर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.