भुसावळातील बड्या अतिक्रमणांवर उद्यापासून फिरणार बुलडोझर
350 व्यावसायीकांना नोटीस : पालिकेने सात पथकांची केली नियुक्ती
भुसावळ : भुसावळ शहरातील अतिक्रमणाबाबत वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासक राजवटीत शहरातील अतिक्रमण काढण्याला गुरुवारचा मुहूर्त गवसला असून त्यानुषंगाने पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. शहरातील 18 बड्या अतिक्रमणांसह अन्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून त्या दृष्टीने अधिकार्यांवर जवाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
अधिकार्यांच्या सात पथकांवर जवाबदारी
गुरुवार, 24 रोजी भुसावळ पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण हटवण्यासाठी मोहिम निश्चित करण्यात आली असून पालिकेतील अधिकार्यांची सात पथके तयार करण्यात आली असून या सातही पथकांना त्यांच्या कामाचे स्वरूप संबंधित जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरातील सर्वच भागातील वर्दळीच्या मार्गावर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही कठीण झाल्याची स्थिती आहे. शहरातील सुमारे 350 अतिक्रमण धारकांना नोटिसा यापूर्वीच बजावण्यात आल्या असून दोन दिवसात त्यांनी अतिक्रमण न हटवल्यास पालिका ते काढणार आहे.
अधिकार्यांवर जवाबदारी निश्चित
नगर अभियंता रीरतेश बच्छाव यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार आस्थापना प्रमुख वैभव पवार या अधिकार्यांना अतिक्रमण संदर्भातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे, जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरची व्यवस्था करणे अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवाय कार्यालय अधीक्षक शेख परवेज अहमद सगीर अहमद यांच्यासोबत कर निरीक्षक चेतन पाटील, वैभव पवार, किशोर सावकारे यांना सहाय्यक म्हणून देण्यात आले आहे. सात अधिकार्यांचे पथक मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी नियुक्त केले आहे.
तर खर्चही वसुल करणार
पालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित व्यवसायीकांना नोटिसा बजावल्या असून कारवाईपूर्वीच पालिकेची जागा मोकळी करण्याचे आवाहन मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे. 24 तारखेला पालिकेतर्फे अतिक्रमण काढण्यात येत असून त्याचा खर्च पालिका संबंधितांकडून वसूल करणार आहे.