भुसावळातील बनावट देशी दारू कारखाना प्रकरण : रवींद्र ढगेला अटक
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : संशयीत आरोपीस न्यायालयाने सुनावली 22 पर्यंत पोलीस कोठडी
भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील फर्निचर गोदामात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवार, 17 रोजी सायंकाळी उद्ध्वस्त केला होता. पथकाने याप्रकरणी रविवारी दुपारी फर्निचर गोदामाचे मालक रवींद्र ढगे यांना अटक केली आहे. संशयीत आरोपी ढगे यांना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
म्होरक्यांची नावे पुढे येण्याची गरज
भुसावळातील फर्निचरच्या कारखान्यात बिनदिक्कत सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यात कोण-कोण भागीदार आहेत शिवाय आतापर्यंत या कारखान्यातून बनावट दारूचा नेमका कुठे पुरवठा करण्यात आला ? खरेदीदार कोण ? या बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. वर्षभरापूर्वीच हा कारखाना सुरू असल्याची चर्चा आहे मात्र त्याबाबत अधिकृत माहिती कळू शकली नाही. या कारखान्याला पुरवण्यात आलेले स्पिरीट, इसेंस, बाटली, बुच तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे मशीन कुठून आणण्यात आले व पुरवठादार कोण? या बाबींचा उलगडा होवून दोषींवरही गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीकातून व्यक्त होत आहे.
आरोपी ढगे यांना पोलीस कोठडी
रवींद्र ढगे यांच्या जागेत बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याने पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने रवींद्र ढगे यांना रविवारी चौकशीकामी ताब्यात घेतले होते व नंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीदरम्यान अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.