भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हवालदारासह तिघांचा मृत्यू

0

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदारासह शहरातील अन्य भागातील दोघा नागरीकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 19 नागरीकांचा मृत्यू झाला असून तब्बल 126 नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 71 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील गुंजाळ कॉलनी व मोमीन पूरा भागातील दोन कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू होते व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मात्र जळगावात वास्तव्यास असलेल्या हवालदाराला मंगळवारीच कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही बुधवारी मृत्यू झाला. शहरात एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

जिल्हा पोलिस दलातील कोरोनाचा पहिला बळी
जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचार्‍यांना मालेगाव बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कॉरंटाईन करण्यात आले होते शिवाय त्यांनी कोरोनावरही मात केली होती मात्र भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात हवालदाराच्या मृत्यूमुळे पोलिस दलात मोठी खळबळ व्यक्त करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिस दलातील पहिल्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हजेरी मास्तर या पदावर कार्यरत हा कर्मचारी अत्यंत शांत व मनमिळावू असल्याने त्यांच्या अकाली जाण्याने कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.