भुसावळातील बियाणी परीवाराच्या 243 प्लॉटवर सरकारी बोजा

26 लाख 29 हजार 42 लाखांचा दंड न भरल्याने तहसीलदारांची कारवाई

भुसावळ : तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट क्र. 96/ 1, 2, 3 या भुखंडाचा अनधिकृत बिनशेती वापर केल्याप्रकरणी शर्तभंग केल्याबाबत प्रांत प्रशासनाने कांताबाई बियाणी यांच्यासह आदींना 26 लाख 29 हजार 42 रुपयांच्या दंड केला होता. दंडाची रक्कम संबंधितांनी न भरल्यामुळे तहसीलदार दीपक धीवरे यांनी या भुखंडावर सदरच्या रकमेचा बोजा बसविण्याची कारवाई नुकतीच केल्याने खळबळ उडाली आहे.

केदार सानप यांच्या तक्रारीनंतर कारवाई
भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट क्रमांक 96/1, 2, 3 हा बिनशेती भुखंडाचा अनधिकृत वापर कांताबाई बन्सीलाल बियाणी वगैरे यांनी केला होता. या प्रकरणी प्रांत प्रशासनाने 10 ऑगस्ट 2021 रोजी दंडाची रक्कम भरण्याचे आदेश केले होते मात्र अद्यापपर्यंत संबंधितांनी दंडाच्या रक्कमेचा भरणा केला नसल्यामुळे तहसीलदार दीपक धीवरे यांनी या गट क्रमांकातील खुल्या भुखंडासह तब्बल 243 प्लॉटवर स्थावर मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिकार प्रत्र क्रमांक/ जमीन-1/ कावि/ 257/2021 दि. 16/12/2021 अन्वये प्रमाणित करुन नोंद करण्यात आली आहे. ही नोंद कुर्‍हे प्र.न.चे मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांनी केली आहे. याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी प्रशासनाकडे भुखंडाचा अनधिकृत वापर तसेच दंडाची रक्कम भरण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार केली होती.