भुसावळातील भंगार गोदामातील वाहनांची फैजपूरच्या पोलिसांकडून आज चौकशी

0

बाजारपेठ पोलिसांचे आरटीओसह विविध विभागांना पत्र

भुसावळ- शहरातील खडका रोड चौफुलीवरील बालाजी तोलकाट्यामागे असलेल्या भंगाराच्या गोदामावर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी छापा टाकत लाखोंच्या इंजिनासह वाहने जप्त केली होती. भंगारात वाहनांची विल्हेवाट लावण्यात आल्याने पोलिसांनी या दृष्टीने कसून तपास सुरू केला असून गोदाम मालक अब्दुल असलम अब्दुल रज्जाक (33, काझी प्लॉट, भुसावळ) व रीझवान शेख यांना पोलिसांनी वाहनांबाबत पुरावे सादर करण्याचे लेखी समजपत्र दिले आहे. दरम्यान, गोदामातील वाहनांबाबत जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांना सूचित करण्यात आले असून गुरुवारी फैजपूर पोलिसांकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे.

आरटीओ विभागाला पोलिसांचे पत्र
बाजारपेठ पोलिसांच्या छाप्यात या गोदामात नऊ उभ्या असलेल्या दुचाकी, 11 दुचाकींची इंजिने, चारचाकी वाहनाचे चार इंजिन तसेच टाटा आयशर वाहनासह लाखोंची अ‍ॅल्युमिनिअम तार आढळली होती. वाहने कुठल्या उद्देशाने तोडण्यात आली, त्याचे मूळ गाडी मालक कोण याबाबत भंगार गोदाम चालकाला पोलिसांनी विचारणा केली असून गोदामातील नंबरप्लेटस तसेच चेसीस व इंजिन नंबराचा संदर्भात देत जिल्हाभरातील पोलिस ठाण्यासह आरटीओ अधिकार्‍यांना तसेच शहर वाहतूक शाखेला सूचित करण्यात आले आहे. जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या वाहनांचा संदर्भ देण्याचे आवाहनही बाजारपेठ पोलिसांनी केले आहे.