भुसावळातील भोई नगरातील समस्यांची मुख्याधिकार्‍यांकडून पाहणी

0

सोयी-सुविधा पुरवण्याबाबत आश्‍वासन ; मोर्चानंतर प्रशासनाकडून दखल

भुसावळ- शहरातील भोई नगर भागातील नागरीकांनी सोयी-सुविधा मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेवर धडक मोर्चा नेत पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले होते तर समस्या पाहण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी यावे याबाबत गळ घातली होती. नागरीकांच्या तक्रारीतील तथ्य जाणून घेण्यासाठी शुक्रवारी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी प्रत्यक्षात या भागाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. माजी नगरसेवक वसंत पाटील, रीतेश बिजलपुरे यांच्यासह अनेकांनी त्यांना या भागातील समस्यांची माहिती दिली.

पालिका पुरवणार सोयी-सुविधा
स्थानिक रहिवाशांनी जुने शौचालय तोडून नव्याने बांधून देण्याची मागणी केली तसेच भोई नगर भागात गटारींचे काम करावे तसेच आरोग्य प्रश्न निर्माण झाल्याने गटारींची स्वच्छता करण्याची मागणी केली तसेच या भागातील गटारींची स्वच्छता होत नसल्याने संबंधित कर्मचार्‍याला निलंबित करण्याची मागणी केलली व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभ या भागातील लोकांना मिळणा तसेच पिण्याचे पाणी मिळाव, स्ट्रीट लाईट नव्याने बसवून मिळवण्यास भोई नगर भागातील खाली-वर पादचारी पायर्‍या नव्याने निर्माण करण्याबाबत मुख्याधिकार्‍यांना साकडे घातले. दोरकुळकर यांनी प्रशासकीय स्तरावर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी सुनील भोई, प्रकाश भोई, रमेश भोई, सुरेश भोई व मोठ्या संख्येने भोई समाजबांधव उपस्थित होते.

भेदभाव न करता विकासकामे व्हावीत -रीतेश बिजलपूरे
प्रभाग क्रमांक आठमधून दोन सत्ताधारी नगरसेवक निवडून आल्यानंतर भोई नगरातील नागरीक सुविधांपासून वंचित आहेत. पालिकेत भाजपाची सत्ता असतानाही नागरीकांना साध्या मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यात प्रचंड संतापाची भावना आहे. सर्व प्रभागात राजकारण न करता विकासकामे होणे गरजेचे आहे, अशी भावना रीतेश बिजलपुरे यांनी व्यक्त केली.