भुसावळ : शहरातील कडू प्लॉट भागात मंगळवारी एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी शहरातील महात्मा फुले नगरात एकाला किरकोळ कारणावरून चौघांनी दगड तसेच विटांनी तोंडावर व डोक्यावर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री 7.45 वाजता घडली. या हल्ल्यात सौरभ यशवंत कुटे (महात्मा फुले नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या ओम क्रिटीकल केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
किरकोळ कारणावरून हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा
विकास सुभाष सपकाळे (25, महात्मा फुले नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार सौरभ यशवंत कुटे हा बुधवारी रात्री महात्मा फुले नगरातून जात असताना संशयीत आरोपींनी तू इकडून का जातो, असे सांगत वाद घातला व दगड-विटांनी तोंडावर तसेच डोक्यावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महात्मा फुले नगरात हल्ला झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व अन्य अधिकारी व तसेच कर्मचार्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. रात्री उशिरा शहर पोलिसात संशयीत आरोपी पवन सोनवणे, पंकज अशोक साळुंके, मनोज अशोक साळुंके व त्यांचा एक साथीदार (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध भादंवि 307, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव पेटकर करीत आहेत.