भुसावळातील माजी नगरसेविका पूत्रासह तिघांना अटक

0

श्री विठ्ठल रूखमाई पतसंस्थेतील कर्ज न भरल्याने कारवाई- आरोपींना 14 दिवसांची कोठडी

भुसावळ- शहरातील श्री विठ्ठल रूखमाई पतसंस्थेतून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेवूनही त्याची फेड न करणार्‍या 185 कर्जदारांविरुद्ध 2011 मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिसात खंडपीठाच्या आदेशानुसार ऑडीटर संजय कळंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याचा तपास जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून तपासाला वेग देण्यात आल्याने कर्जदारांवर अटकेची कारवाई केली जात आहे. गुरुवारीदेखील भुसावळातील माजी नगरसेविका सुशीला अहिरे यांचे पूत्र जीवन दत्तु अहिरे (35, उंट मोहल्ला, भुसावळ) यांच्यासह गजेंद्र शालिग्राम सैनी (57, भुसावळ) व साजीद खान मोहम्मद खान कलीम (39, खडका रोड, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. अहिरे यांच्यावर 24, सैनी यांच्यावर नऊ तर साजीद यांच्यावर 14 लाखांचे कर्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींना जळगाव न्यायालयातील न्या.गरड यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रभारी उपअधीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, हवालदार प्रवीण जगताप, जीवन पाटील, अधिकार पाटील, दिलीप चव्हाण, रवींद्र परदेशी आदींच्या पथकाने केली.