भुसावळातील माणकबाग भागात महिनाभरात सहाव्यांदा घरफोडी

0

रहिवाशांमध्ये घबराट ; बाहेरगावी जाताना मौल्यवान दागिन्यांसह रोकड घरात न ठेवण्याचे पोलिसांचे आव्हान

भुसावळ- शहरातील मानकबाग कॉलनी परीसरात महिनाभरात तब्बल सहाव्यांदा घरफोडी झाल्याने या भागातील नागरीक कमालीचे दहशतीखाली असून वारंवार होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांची गस्त या नावालाच होत असल्याचा आरोप नागरीक करीत असून जुन्या चोर्‍यांसह घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना नव्याने होणार्‍या गुन्ह्यांमुळे घबराट पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच दोन घरे फोडल्याची घटना ताजी असताना बुधवारी दुपारी पुन्हा संजय घनश्याम चौधरी (मानकबाग कॉलनी) यांच्या घरात घरफोडी झाल्याचे उघडकीस आले.

घरफोडीनंतर चोरट्यांचा असाही चकवा
संजय चौधरी यांचे शांती नगर भागात किराणा दुकान असून ते कुटुंबासह सोमवारी पुण्याला गेले होते तर बुधवारी दुपारी अडीच वाजता परतल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे चौधरी कुटुंबियांनी दाराच्या दर्शनी भागाला पडदा लावून कुलूप लावले होते तर चोरट्यांनी पडदा बाजूला करीत कडी-कोयंडा तोडत घरात सामान अस्ताव्यस्त केला तसेच सुमारे दिड हजारांची चिल्लर, तोरड्या जोडवे आदी ऐवज लांबवला. चोरीची शंका शेजार्‍यांना न येण्यासाठी जाताना चोरट्यांनी पुन्हा पडदा पूर्वीप्रमाणे ठेवल्याने चोरी झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. शहर पोलिसांना माहिती कळताच त्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.

पोलिसांची गस्त केवळ रस्त्यावरून
प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाजवळून मानकबाग भागाला सुरुवात होते तर सुमारे तीन हजार वस्तीच्या या भागात शहर पोलिसांचे गस्ती वाहन आले तरी सायरन वाजवत येत असल्याने चोरटे सावध होतात, असे नागरीकांचे म्हणणे आहे. या भागात नियमित गस्त घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महिनाभरात सहा घरफोड्या
माणकबाग भागात महिनाभरात तब्बल सहा बंद घरांमध्ये घरफोड्या झाल्या आहेत. त्यात भीमराव सुरवाडे यांच्या घरातून सोन्यासह रोकड मिळून दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला तर भागवत फेगडे यांच्याकडे पाच हजारांची चोरी झाली तसेच दीपक बाळे कोळी यांचे घर फोडले असलेतरी रीकाम्या हाताने चोरटले परतले. या घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी मंगळवारी पहाटे शिलाबाई अशोक शर्मा तसेच दीपक कोळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूपही चोरट्यांनी तोडले मात्र घरात काही एक मुद्देमाल नसल्याने रीकाम्या हाताने चोरट्यांना परतावे लागले. दरम्यान, चोरटे दिवसा टेहळणी करून रात्री बंद घरांना टार्गेट करीत असल्याने नागरीकांनी रात्रीची गस्त राबवण्याबाबत विचार सुरू केला असून त्याबाबत बैठक घेणार असल्याचे प्रा.जतीन मेढे म्हणाले.