भुसावळातील मिरची ग्राउंड परीसरातील गटारी तुंबल्या
नागरीकांचे आरोग्य आले धोक्यात : डेंग्यूचा धोका वाढला ; नागरीकांमध्ये संताप
भुसावळ : मिरची ग्राउंड परीसर, म्हाडा कॉलनीत गटारी तुंबल्याने डासंचा उपद्रव वाढला असून परीसरात डेंग्यूचा धोका वाढला आहे. सध्या शहरात डेंगू या जीवघेण्या रोगाचे रुग्ण आढळत आहेत त्यामुळे या परीसरात मलेरीया, डेंगू सारख्या साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. गटारी तुंबल्याने घरात आणि घराबाहेर घाण वास येत आहे. गटारीचे पाणी पुढे जात नसून एकाच ठिकाणी तुंबले आहे. काही घरांच्या किचन आणि बाथरूमच्या पाईपवर घाण पाण्याची लेव्हल आली आहे. दुर्गधीमुळे घराच्या बाहेर थोडा वेळ देखील उभे राहू शकत नसल्याची संतप्त भावना परीसरातील नागरीकांनी व्यक्त केली.
दहा वर्षांपासून नागरीकांना त्रास
गेल्या दहा वर्षांपासून या भागातील नागरीक हा त्रास सहन करत आहेत. नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी मागील वर्षी गटारींचा तात्पुरता गाळ काढला होता. पण काही दिवसात ही समस्या जैसे थे झाली तसेच आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पाहणी करून आश्वासन दिले होते मात्र पाठपुरावा झाला नसल्याचे नागरीकांनी सांगितले. नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मिरची ग्राउंड भागातील गटारींची समस्या तत्काळ सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
काय आहे नेमकी समस्या?
मिरची ग्राउंडवर संपूर्ण नवीन म्हाडा कॉलनी आणि शेजारी असलेल्या लक्ष्मी नगरच्या गटारीचे संपूर्ण पाणी एकत्र जमा होते. मात्र या पाण्याचा पुढे निचरा होत नाही. यासाठी जे पाईप लावले आहेत त्यांचा उतार चुकीच्या दिशेने काढला असल्याने पाणी पुढे जात नाही व तिथेच तुंबते. ही समस्या सोडवण्यासाठी कॉलनीतील दोन ठिकाणचे पाईप बदलून गटारीच्या पाण्याला योग्य उतार दिला तरच ही समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे नागरीकांचे म्हणणे आहे.