भुसावळातील मॉडर्न रोडवर वाहतुकीची कोंडी

0

दुकानदारांच्या वाहनांसह फलक आले रस्त्यावर : पायी चालणेही कठीण

भुसावळ- शहरातील वर्दळीच्या मॉडर्न रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह पादचारी हैराण झाले आहेत. प्रशस्त असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकाने असलीतरी दुकानदारांनी मनमानी पद्धत्तीने आपापल्या दुकानाचे फलकांसह वाहने रस्त्यावर लावल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना चालणेही कठीण झाले आहे. वाहतुकीला शिस्त लावणारी शहर वाहतूक शाखेची यंत्रणा मात्र आलबेल आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अपर पोलिस अधीक्षकांनीच आता हा तिढा सोडवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

फलक आले रस्त्यावर
भुसावळ शहरातील आजघडीला सर्वाधिक मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे. वर्षानुवर्षे सातत्याने वाढत चाललेली अतिक्रमण, वाढती लोकसंख्या व त्यासोबतच दररोज शेकडोने नव्याने रस्त्यावर येणार्‍या वाहनांमुळे ही समस्या अधिकच उद्भवत आहे. शहरातील सर्वच प्रमुख वर्दळीच्या मार्केटमध्ये वाहन पार्क करण्यास जागाच नसल्याचे दुर्दैव आहे. शहरातील मॉडर्न रस्त्याचा विचार केल्यास दुकानदारांनी आपापले फलक रस्त्यावर नेवून ठेवून आले शिवाय वाहने देखील दुकानाच्या समोर लावण्यात आल्याने चारचाकी वाहनांसह रीक्षा समोरा-समोर आल्यास अनेकदा वादाचे प्रसंगी उद्भवत आहेत. शहर वाहतूक शाखेकडून या संदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्याने दुकानदारांचे फावले आहे.

पार्किंगचे दिवस ठरवल्यास सुटणार वाद
शहरात पार्किंगसंदर्भात कुठलेही नियम नसल्याने वाहनधारक मनमर्जीप्रमाणे वाहने लावत असल्याने वादाचे प्रमाण वाढले आहेत. वादाची कोंडी फोडण्यासाठी पार्किंगचे दिवस ठरवल्यास दुकानदारांना तसेच वाहनधारकांना सोयीचे होणार आहे. शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा असलीतरी या शाखेचे कामकाज नावालाच सुरू आहे. शहर वाहतूक शाखेत डॅशिंग व खमक्या सहाय्यक निरीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सुज्ञ शहरवासीयांकडून होत आहे.

अवैध वाहतुकीचा विळखा कायम
भुसावळ बसस्थानकाला अवैध वाहतुकीचा विळखा कायम आहे. शुक्रवारच्या अंकात ‘दैनिक जनशक्ती’ने ‘पोलिसांदेखत अवैध वाहतूक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. दुपारपर्यंत काही अ‍ॅपे रीक्षांवर कारवाई करण्यात आल्याचा देखावा झाला मात्र सायंकाळनंतर ‘जैसे थे’ वाहतूक सुरू होती. स्थानिक पोलिसांकडून कारवाईला बगल दिली जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.