भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांचा पत्रकार परीषदेत आरोप
भुसावळ- सत्ताधारी काम करीत नसल्याने आमदारांनी पुढाकार घेवून यावल रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान होते मात्र नियम धाब्यावर बसवून यावल रस्त्याचे अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने काम सुरू असून चार महिन्यात रस्त्याची दुरवस्था होईल, असा दावा भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनी सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परीषदेत केला. शनी मंदिर वॉर्डातील सियाराम कॉम्प्लेक्समधील कार्यालयात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या रस्त्याचे बिंग उघडकीस आणणार्या कर्मचार्याला धमक्या दिल्या जात असून भाजपा पदाधिकार्यांकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावल रस्त्याचे काम निकृष्ट
सचिन चौधरी म्हणाले की, फोरवे प्रकल्पातील अभियंता सुरज तिवारी यांनी यावल रस्त्याच्या कामासाठी माती टाकून काम होत असल्याबाबत फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून आपणास टॅग केल्याने आपण स्वतः घटनास्थळी भेट देवून झाल्या प्रकाराची शहानिशा केली होती तर बांधकाम विभागाचे अभियंता एस.वाय.कुरेशी यांना घटना कळवल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना चौकशीकामी पाठवल्यानंतर त्या अधिकार्यांनी निकृष्ट काम होत असल्याच्या बाबीला दुजोरा देत माती तत्काळ उचलण्याच्या सूचना केल्या मात्र त्यानंतर त्याच पद्धत्तीने काम करण्यात आले. या प्रकारानंतर तिवारी यांना नोकरी घालवण्याच्या धमक्या दिल्या जात असून खोट्या गुन्ह्यात अडकावण्याची धमकी भाजपा पदाधिकारी देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अतिक्रमण वाढले, आरोग्य धोक्यात
शहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत असून स्वच्छता नावालाच केली जात आहे. पालिका प्रशासन व सत्ताधार्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून टक्केवारीने मात्र बिले निघत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. यावल रस्त्यावरून मेन रायझिंग काढल्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाल्याने हे काम करण्याची जवाबदारी जैन कंपनीची होती शिवाय यापूर्वी या कामाचे बिल निघाल्याने ते बिल परत घेवून यावल रस्त्याच्या कामासाठी येणारा खर्च संबंधित कंपनी व या प्रकाराला जवाबदार असलेल्यांकडून वसुल करावा, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले. पालिकेत डिझेलचा मोठा भ्रष्टाचार लवकरच आपण बाहेर काढणार असून स्वच्छतागृहाच्या जागांवर आता दुकाने बांधली जात असल्याचे ते म्हणाले.
ठेकेदाराकडून भरपाई वसुल करा
नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले की, यावल रस्त्याच्या कामाची भरपाई जैन कंपनीकडून वसुल करावे ही आपली मागणी आहे. शहरात स्वच्छता होत नसताना दुसरीकडे लाखोंची बिले निघत असल्याचे ते म्हणाले. आशिक खान शेर खान म्हणाले की, जाम मोहल्ल्यात प्रचंड अस्वच्छता होत असून विकासात्मक कामे होत नाहीत शिवाय मरीमाता मंदिरासह सर्वे क्रमांक 31, लक्ष्मी नारायण मंदिराजवळील जागेवर बेकायदा दुकाने बांधली जात असून कब्रस्थानची जागाही हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवक उल्हास पगारे यांनीदेखील शहरात विकासकामे थांबली असल्याचे सांगून अद्याप सर्वसाधारण सभा झाली नसल्याचे सांगत जनहितासाठी राष्ट्रवादी आता व्यापक आंदोलन छेडणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, कम्मा पहेलवान, जाकीर शेख, राहुल बोरसे, सनी गोणे उपस्थित होते.
चुकीचे काम होत असल्यास चौकशी करणार -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, चुकीच्या पद्धत्तीने काम होत असल्यास निश्चितच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे चौकशी करून सुधारणा करू मात्र महामार्ग व शहरातील रस्त्यांच्या कामात फरक असतो. कुणाला धमकी मिळाली असल्यास त्यांनी पोलिसात तक्रार करावी, असेही ते म्हणाले.