भुसावळातील यावल रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात पडले खड्डे

निकृष्ट रस्ता कामांना वाहनधारकांसह शहरवासी वैतागले : दर्जेदार कामाची अपेक्षा

भुसावळ : एक कोटी दहा लाख रुपये खर्चातून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच यावल रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे दिवसागणिक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांना अधिक मनस्ताप सोसावा लागत आहे. दर्जेदार काम करण्याबाबत वारंवार सूचना केल्यानंतरही ठेकेदाराने सूचनांना हरताळ फासत निकृष्ट काम केल्याने त्याची शिक्षा शहरवासीयांना भोगावी लागत आहे. ठेकेदाराकडून रस्त्याचे दर्जेदार पद्धत्तीने काम करून घ्यावे, असा सूर शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.

एकाच ठेकेदाराला दोनवेळा मिळाले काम
यावल रस्त्याच्या दोन हजार 300 मीटर अंतराच्या रस्त्याचे काम गत अर्थसंकल्पात मंजूर झाले होते. शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी या रस्ता कामाची निविदा काढूनही तांत्रिक अडचणींमुळे काम न झाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया बोलाविल्यानंतर त्याच ठेकेदाराला काम मिळाले मात्र वर्षभरानंतरही ठेकेदाराकडून काम होत नसल्याने आमदारांनी या संदर्भात आवाज उठवताच रस्ता कामाला 1 फेब्रुवारी रोजी सुरूवात झाली मात्र कामाच्या दोन दिवसानंतर ठेकेदाराने डांबर नसल्याचे कारण पुढे करीत काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवार, 16 मार्चपासून कामाला सुरूवात करण्यात आली होती.

सहा महिन्यातच रस्त्यावर पडले खड्डे
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले. त्यासाठी एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामात तापी नदी पुलावर कारपेट टाकणे, स्मशानभूमीजवळील कामासह यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश होता. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्चूनही निकृष्ट पद्धत्तीने काम करण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यात यावल रस्ता खड्डेमय झाल्याने शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पावसाळा संपताच रस्ता दुरुस्ती : सा.बां.विभाग
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची निश्‍चितच दुरवस्था झाली आहे. कंत्राटदार वाय.एम.महाजन यांना एक महिन्यांपूर्वीच यावल रस्त्यावरील खड्ड्यांबाबत पत्र देण्यात आले असून पावसाळा संपताच रस्त्याची दुरवस्था थांबवण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता परशुराम ठाकूर ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले. तीन वर्षापर्यंत रस्ता दुरुस्तीची जवाबदारी कंत्राटदाराची असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.