भुसावळातील युवकाच्या खून प्रकरणी आरोपीला सात वर्ष शिक्षा
भुसावळात सत्र न्यायालयाचा निकाल : 2017 मध्ये श्री विसर्जन मिरवणुकीत झाला होता खून : आरोपीला दहा हजारांचा दंड
Murder of youth in Shree Visarjan procession in Bhusawal : Accused Golu Sawkare sentenced to seven years भुसावळ : शहरात श्री विसर्जन मिरवणुका सुरू असताना बहिणीची छेडखानी केल्याच्या वादातून विकी उर्फ ललित हरी मराठे (24, न्यू एरीया वॉर्ड, भुसावळ) या तरुणाचा आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (20) याने चाकूचे वार करीत खून केला होता. मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 9 वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोपी गोलू सावकारे यास सात वर्ष शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.
5 सप्टेंबरचा असाही योगायोग
5 सप्टेंबर 2017 रोजी ललित मराठे या तरुणाचा आरोपी गोलू सावकारे याने खून केला तर 5 सप्टेंबर 2022 न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला सात वर्षांची शिक्षा सुनावली तर 5 सप्टेंबर रोजी गोलू सावकारे याचा वाढदिवसदेखील असल्याने या योगायोगाचीदेखील चर्चा होताना दिसून आली. दरम्यान, आरोपीला झालेल्या शिक्षेने मयताच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
वर्मी घाव बसताच तरुणाचा झाला होता मृत्यू
सन 2017 मध्ये भुसावळ न्यू इंडिया सब्जी मंडळ हे मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता न्यू एरीयातून श्री विसर्जनासाठी निघाले होते. शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ हे मंडळ येताच संशयीत आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (20) याने मयत ललितला आपल्या बहिणीची छेडखानी का करतो? म्हणून जाब विचारत वाद घातला. दोघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आरोपी सावकारेने आपल्याकडे असलेला धारदार चाकू ललितच्या डाव्या बरगडीत मारून पळ काढला. सुरुवातीला किरकोळ इजा झाल्याचे कार्यकर्त्यांना वाटल्याने त्यांनी शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने गोदावरीत हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र रस्त्यावर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताचा आतेभाऊ धीरज मराठे याने पोलिसात फिर्याद दिली होती.
प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची
भुसावळ न्यायालयात सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. या प्रकरणात 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी गोलू उर्फ राजेंद्र उर्फ गणेश सुभाष सावकारे यास विकी भादंवि 304 ब अंतर्गत दोषी धरीत न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड सुनावला. तर दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रवीण भोंबे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनसिंग राठोड व सहाय्यक फौजदार शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली. मूळ फिर्यादीतर्फे अॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी मदत केली.