भुसावळातील युवतीला आत्महत्येस भाग पाडणार्‍या झिरो पोलिसाचा अटकपूर्व फेटाळला

भुसावळ : भुसावळातील झिरो पोलिसाकडून होणार्‍या जाचाला कंटाळून शहरातील सिंधी कॉलनीतील हर्षलीन सोढाई (21) या तरुणीने 8 मे रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत मुलीची आई मंजू सोढाई यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी नारायण अशोककुमार ठारवानीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत आरोपीने भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर शुक्रवार, 28 मे रोजी न्या.आर.आर.भागवत यांनी तो फेटाळला.

लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून जाच
शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी हर्षलीन हिचे नारायणसोबत प्रेम प्रकरण होते मात्र हर्षलीनने नारायणसोबत लग्नाला नकार दिला. यामुळे तो हर्षलीनला वारंवार त्रास देत होता. हर्षलीनच्या मोबाईलवर धमकीचे संदेश देत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून हर्षलीनने 8 मे रोजी राहत्या घरात छताला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्येपूर्वी तिने लग्नाला नकार दिल्यामुळेच नारायण हा वारंवार धमकी व त्रास देतो, त्याचे सिंधी कॉलनीतील अन्य मुलीशी प्रेमप्रकरण असल्याने मी त्याच्याशी विवाह करत नाही, अशी माहिती आईला दिली होती व आई मंजू सोढाई यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्या.आर.आर.भागवत यांनी आरोपीचे वकील, सरकारील वकील व फिर्यादीचे वकील यांच्यातील युक्तीवाद ऐकल्यानंतर तो फेटाळला. फिर्यादीतर्फे अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय तर सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.