भुसावळ : राज्यातील रक्ताची मागणी वाढली असतांना मुख्यमंत्री उद्धवठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. त्याअनुषंगाने शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील, बबलू बर्हाटे आणि सुरज पाटील यांच्या समन्वयाने श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्री रीरदम हॉस्पिटल येथे गुरुवार, 2 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील धनवंतरी ब्लड बँकेचे याकामी सहकार्य लाभले. यावेळी 47 दात्यांनी टप्प्याटप्याने रक्तदान केले. सकाळी 7 ते 10 वेळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाचवेळी 4 दात्यांचे रक्त स्वीकाराले गेले. तसेच रक्तदात्यांना रक्तदानास येण्यासाठी वेगवेगळी वेळ देण्यात आली होती. ती वेळ रक्तदात्यांनीसुद्धा पाळली. यामुळे सहज गर्दी टाळता आली.
महिलांनी नोंदवला सहभाग
श्री रीदम रुग्णालयात रक्तदानासाठी आलेल्या व्यक्तीचे प्राथमिक तपासणी करण्यात आली यात ताप, रक्तदाब तसेच आवश्यकता भासल्यास इसिजी काढले गेले. या तपासणी नंतरच रक्तदान झाले. महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवला.
यांचे लाभले योगदान
या रक्तदान शिबिरात डॉ.नितीन पाटील, डॉ.गणेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. प्रवीण महाजन यांनी रक्तदात्यांची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री रीदम मेडिकलचे गौतम चोरडिया, गणेश पाटील, मृगेन कुलकर्णी, स्वप्नील पवार, अविनाश यादव, गौरव पवार, संदिप महाजन, निलेश माळी, धनराज ठाकूर व पवन नाले यांनी परीश्रम घेतले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली काळजी
रक्तदान करण्यासाठी अनेक नागरिक इच्छित होते परंतु रक्तदाते निवडतांना काळजी घेण्यात आली. सर्व दाते भुसावळ शहरातीलच असून गेल्या महिनाभरात जे नागरीक बाहेरगावी गेले नाहीत तसेच महिनाभरात बाहेरील गावच्या व्यक्तिंशी ज्यांचा संपर्क प्रत्यक्ष झाला नाही असेच दाते निश्चित करण्यात आले होते, असे समन्वयक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
उपक्रमास मान्यवरांच्या सदिच्छा भेट
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देउन शिस्तबद्ध रक्तदान सुरु असतांना रेल्वे कामगार सेनेचे ललितकुमार मुथा, सिध्दीविनायक इन्फोटेकचे यतीन ढाके, सुराणा ग्रुपचे अशोकचंद सुराणा, कृउबा समिती सदस्य जयंतीलाल सुराणा, संतोष सोनवणे, डॉक्टर, वकील, पत्रकार, अभियंता, उद्योजक व समाजसेवक यांनी भेट देउन प्रोत्साहन दिले.