वाहतूक शाखेच्या अधिकार्यांची धडक कारवाई : गणवेशासह बिल्ला नसलेले रडारवर
भुसावळ- रीक्षा चालवताना खाकी गणवेशासह बिल्ला नसलेल्यास कारवाईचा ईशारा शहर वाहतूक शाखेने शहरातील रीक्षा चालकांना दिला होता मात्र नेहमीप्रमाणे रीक्षा चालकांनी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखेने कारवाईसाठी कंबर कसली आहे. पहिल्याच दिवशी 28 रीक्षा चालकांवर कारवाई करून पाच हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर शनिवारीदेखील शहरातील विविध भागात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी धडक कारवाई सुरू केल्याने रीक्षा चालकांच्या उरात चांगलीच धडकी भरल्याचे चित्र दिसून आले.
अल्टीमेटमनंतरही दखल न घेतल्याने कारवाई
शहरातील प्रत्येक रीक्षा चालकाने वाहन चालवताना खाकी गणवेश परीधान करण्याची सूचना देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी शहरातील विविध रीक्षा थांब्यावर जाऊन चालकांना सूचित केले होते. त्यासाठी गणेश चतुर्थीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने शुक्रवारपासून कारवाई सुरू करण्यात आली. बसस्थानक, शहर पोलिस ठाणे आणि नाहाटा कॉलेज परिसरात शुक्रवारी कारवाई करण्यात आली. गणवेश परिधान न करणार्या री क्षाचालकांना प्रत्येकी 200 रूपयांचा दंड करण्यात आला. याच मोहीमेत नियम मोडणार्या अन्य 10 वाहनधारकांवरदेखील कारवाई करण्यात आली.
ट्रिपलसीट रडारवर
गुरूवारी गणवेश न घालणार्या रिक्षा चालकांसह दुचाकीवर ट्रिपलसीट फिरणार्या 39 वाहनधारकांवर कारवाई करून सात हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आगामी काळात पोलिसांतर्फे शहरातील विविध भागात नाकाबंदी केली जाणार आहे. रिक्षाचालकांसह अन्य वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी मोहीम राबवली जात आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नूतन पोलिस उपअधीक्षकांच्या पावित्र्याचे स्वागत
भुसावळचे नूतन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने शहर वाहतूक शाखेला सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून नियंम तोडणार्या वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. शनिवारी गांधी पुतळा, अष्टभुजा देवी मंदीर, बाजारपेठ पोलिस ठाणे, जळगाव नाका, यावल नाका आदी ठिकाणी शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई केली जात आहे.