भुसावळातील रेल्वेच्या लाचखोर अधिकार्‍यांना 20 पर्यंत सीबीआय कोठडी

भुसावळ डीआरएम कार्यालयातील दोन लाख 40 हजारांचे लाच प्रकरण : डीआरएमसह अन्य बड्या अधिकार्‍यांची होणार चौकशी

भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दालनातच अटक केली होती. संशयीत आरोपींना मंगळवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक बड्या अधिकार्‍यांची आता सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती सीबीआय अधिकार्‍यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली.

लाच प्रकरणाने डीआरएम कार्यालयात उडाली खळबळ
मलकापूर येथील एमएनवाय कन्सल्टिंग प्रा.लि. कंपनीच्या दोन लोवेस्ट निविदा ऑनलाईन मंजूर झाल्यानंतर या मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर संजय रडे यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने नागपूर सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तब्बल तीन दिवसांपासून भुसावळात सीबीआय पथक तळ ठोकून होते व अखेर सोमवारी आरोपींनी लाच घेण्याचे तक्रारदाराला कळवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी 12.30 वाजता आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

तीन दिवसांपासून भुसावळात पथक तळ ठोकून
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर सीबीआयने लाचेची पडताळणी करीत तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सापळा रचला होता. गेल्या तीन दिवसांपासून भुसावळात सीबीआयचे पथक खाजगी हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. सोमवारच्या दिवशी संशयीत आरोपींनी लाच स्वीकारण्याचे तक्रारदाराला सांगितल्याने नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात 16 पुरूष अधिकारी व दोन महिला अधिकार्‍यांनी सापळा रचला. संशयीत आरोपींनी आपापल्या दालनातच लाच स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

गुप्तांचे बर्‍हाणपूरमध्ये लॉकर : पुण्या-मुंबईत प्लॅट
भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. डोरले यांच्या न्यायासनापुढे गुप्ता व रडे यांना मंगळवारी दुपारी हजर करण्यात आले. सीबीआय अधिकार्‍यांसोबत त्यांचे वकील विक्रमजीत यादव (नागपूर) यांनी युक्तीवाद केेला. गुप्ता यांच्या घरात 15 लाखांची रोकड आढळली असून बर्‍हाणपूरला त्यांचे बँक लॉकर्स असून पुण्या-मुंबईत प्लॅट आहेत शिवाय या लाच प्रकरणात आणखी काही बड्या अधिकार्‍यांचा सहभाग असल्याने सीबीआय कोठडीची त्यांनी मागणी केली तर संशयीतांतर्फे अ‍ॅड.बी.डी. गामोट यांनी बाजू मांडली. यावेळी सीबीआयचे उपअधीक्षक एस.अर. चौगले, दिनेश तळपे, तपासाधिकारी निरज गुप्ता व त्यांचे सहकारी हजर होते

रडेंच्या घरात प्रॉपर्टीची कागदपत्रे सापडली
संशयीत आरोपी तथा कार्यालय अधीक्षक संजय रडे यांच्या घरात सीबीआयला प्रॉपर्टींचे कागदपत्र तसेच भुसावळातील एमआयडीसी परीसरात त्यांच्या पत्नीच्या नावे कंपनी टाकण्ययाबाबतचे महत्वपूर्ण कागदपत्रे सापडल्याचे सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, गुप्ता यांच्या पुण्यासह-मुंबईतील मालमत्तांची झडती सुरू असून बर्‍हाणपूर येथील बँक लॉकर्समध्ये काय-काय आढळते ? याकडे आता लक्ष लागले आहे.

डीआरएम कार्यालयातील बड्या अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या
सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत आरोपींनी डीआरएम कार्यालयातील बड्या अधिकार्‍यांना देखील निविदा मंजुरीनंतर टक्केवारीनुसार पैसे द्यायचे असल्याचे सांगत तक्रारदाराकडून लाच मागितली आहे त्यामुळे डीआरएम यांच्यासह वरीष्ठ अभियंता (समन्वय) यांची सीबीआय चौकशी करणार असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, लाच प्रकरणी अटकेतील एम.एल. गुप्ता हे सहा महिन्यांपूर्वी येथे बदलून आले असून याच पदावर राहिलेल्या काही अधिकार्‍यांची आता सीबीआय चौकशी करणार असल्याची माहिती सीबीआय अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, लाच प्रकरणी दोघा अधिकार्‍यांच्या निलंबनाबाबत वरीष्ठ स्तरावर अहवाल सादर झाल्याचे समजते.