भुसावळातील रेल्वे बोगद्याखाली कर्नाटकातील वयोवृद्धाचा मृत्यू : सुरूवातीला होती घातपाताची शक्यता

भुसावळ शहरातील महात्मा फुले नगराजवळील रेल्वे बोगद्याखाली आढळला मृतदेह ः उपासमारीसह आजारपणामुळे मृत्यूचा संशय

भुसावळ : कर्नाटक राज्यातील 67 वर्षीय वयोवृद्धाचा भुसावळातील महात्मा फुले नगराजवळील रेल्वे बोगद्याखाली रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह सापडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरूवातीला हा मृत्यू घात-पाताने झाल्याचा संशय आल्याने पोलिस प्रशासनाने सर्वोतोपरी खबरदारी घेत जळगावहून फॉरेन्सिक टीमसह श्‍वान पथकाला पाचारण केले मात्र सखोल तपासाअंती वयोवृद्धाचा मृत्यू हा उपासमारीसह आजारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा श्‍वास घेतला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धर्माप्पा व्यंकटप्पा शेट्टी (67, रा.1284 वरम्बू हाऊस बंटवा लाटालुक मणिनलकुर, दक्षिण कर्नाटक) असे मयताचे नाव आहे.

घात-पाताच्या शक्यता पडताळल्या
महात्मा फुले नगरातील रेल्वे बोगद्याखाली अज्ञात वयोवृद्ध रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी निरीक्षक राहुल गायकवाड, सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी व सहकार्‍यांनी धाव घेतली. जळगाव येथून श्‍वान पथकासह फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. सर्व बाजूंच्या शक्यता पडताळल्यानंतर वयोवृद्धाचा घातपाती मृत्यू नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्‍वास घेतला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून वयोवृद्ध या परीसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शिवाय तीन दिवसांपासून वयोवृद्ध उपाशी असल्याने शिवाय आजारी असल्याने चक्कर येवून पडला असावा व त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलिसांना काढला. या प्रकरणी शहर पोलिसात नाईक जाकीर हारुण मन्सुरी यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शवविच्छेदनानंतर उलगडा
भुसावळातील रेल्वे बोगद्याखाली मृत झालेल्या धर्माप्पा व्यंकटप्पा शेट्टी (67, रा.1284 वरम्बू हाऊस बंटवा लाटालुक मणिनलकुर, दक्षिण कर्नाटक) यांचा मृतदेह तीन दिवस शवपेटीत ठेवण्यात येणार असून त्यानंतर शवविच्छेदन केले जाणार आहे व त्यानंतरच मृत्यूचे ठोस कारण कळू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेट्टी हे गेल्या तीन दिवसांपासून या परीसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली शिवाय ते परराज्यातून उदरनिर्वाहानिमित्त या भागात आले असावेत? अशी शक्यताही देखील वर्तवली जात आहे.