भुसावळ- आधार सिडींग करण्यासाठी 26 हजारांची लाच घेणार्या भुसावळ तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन प्रफुल्ल पांडुरंग कांबळेसह खाजगी पंटर रहिम मोहम्मद गवळी यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात पकडले होते. आरोपींना बुधवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची म्हणजे 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानदाराकडे लाचेची मागणी
शहरातील एका रेशन दुकानदाराकडे आरोपी प्रफुल्ल कांबळे याने 73 रेशन कार्ड धारकांचे आधार सिडींग करण्यासाठी सुरुवातीला 500 व नंतर 700 रुपयांप्रमाणे एकूण 51 हजार 100 रुपयांची मागणी केली होती व सुरुवातीला अर्धी रक्कम 26 हजार रुपये मंगळवारी देण्याचे सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती तर पथकाने लाचेची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सापळा रचून सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी तथा पुरवठा विभागाचा अव्वल हिशोब कारकुन प्रफुल्ल पांडुरंग कांबळे (39, विमल पाटील नगर, भुसावळ) व खाजगी पंटर तथा रेशन दुकानदार रहिम मो.गवळी (अन्सार उल्ला नगर, भुसावळ) यास पकडले होते. आरोपींच्या घराची रात्री उशिरा घर झडती घेण्यात आली मात्र त्यातही काहीही आढळले नाही तर बुधवारी आरोपींना भुसावळ अतिरीक्त न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वरीष्ठ अधिकार्यांच्या अडचणी वाढणार
अव्वल कारकूनासह खाजगी पंटराच्या सापळा पडताळणीदरम्यान त्यांनी वरीष्ठ अधिकार्यांनादेखील पैसे द्यावे लागतात, असे सांगितल्याची माहिती आहे तर या प्रकरणी एसीबीकडे आता वरीष्ठ अधिकार्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुसावळ तहसील कार्यालय यापूर्वीही लाचखोरीसाठी बदनाम होते तर आता तर सापळ्यातच अधिकारी अडकल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे. जे कुणी दोषी असतील त्यांची निश्चित चौकशी होईल, असे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर म्हणाले.
तहसीलदारांकडून पैशांची मागणी -गणेश सनांसे
भुसावळ तहसील कार्यालयात विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचारी पैशांची मागणी करतात, असा आरोप स्वस्त धान्य दुकानदार गणेश सनांसे यांनी केला असून ते म्हणाले की, या प्रकारात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचाही सहभाग असून जो येथे पैसा देईल, त्याचे काम केले जाते. आधार कार्ड सिडींगचे 92 टक्के काम झाल्यानंतर प्रशासनाने दुकानदारांना नोटीसा दिल्या असल्याचे सनांसे यांनी सांगत जानेवारीचे धान्य आल्यानंतरही ते देण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, तहसीलदारांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडण करीत गणेश सनांसे यांना आपण ओळखत नसल्याचे ते म्हणाले.