भुसावळ : दुय्यम कारागृहातील मुलाला भेटू देण्यासह त्यास घरचा डबा देण्यासाठी व जळगाव कारागृहात हलवू न देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे (41, रा.शिंदखेडा, ता.धुळे) यास जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली होती. आरोपी देवरे यास मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लाच स्वीकारताच केली अटक
48 वर्षीय महिला तक्रारदार यांच्या मुलास एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली असून तो भुसावळ दुय्यम कारागृहात आहे. मुलास जळगाव जिल्हा कारागृहात न पाठविण्यासाठी व जेलमध्ये त्याला घरचा जेवणाचा डबा देण्यासह भेटू देण्यासाठी व इतर सवलती देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक देवरे यांनी 10 नोव्हेंबर रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रादार महिलेने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महिलेकडून आरोपी देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यास पंचांसमक्ष अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीला मंगळवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.
लाच मागितल्यास साधा संपर्क
कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. संपर्कासाठी जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार व दुरध्वनी क्रमांक 0257-2235477 तसेच मोबाईल 8766412529 तसेच टोल फ्रि कक्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे एसीबीतर्फे कळवण्यात आले आहे.