भुसावळातील वाहतूक समस्या प्राधान्याने सोडवणार

0

भुसावळ : भुसावळ शहरात वाहतुकीची सर्वाधिक गंभीर समस्या असून लवकरच ही समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक संदीप आराक यांनी दिली. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातून त्यांची भुसावळात बदली झाल्यानंतर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सोमवारी सकाळी ‘दैनिक जनशक्ती’ कार्यालयाला आराक यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भुसावळ विभागीय कार्यालयाचे प्रमुख गणेश वाघ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

पार्किंगची समस्या सोडवणार
भुसावळ शहरात विविध भागात असलेल्या संकुलाबाहेर पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांसह नागरीकांना मोठा मनस्ताप होत असल्याबाबत आराक यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, यापुढे शहरातील विविध भागांना भेटी देवून व्यापार्‍यांशी चर्चा केली जाईल तसेच पार्किंगचे सम-विषम दिवस ठरवले जातील त्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. शहरातील वर्दळीच्या भागात बेशिस्तपणे लोटगाड्या जावून वाहतूक कोंडी केली जात असल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणार असून वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणार्‍या विक्रेत्यांवरही पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जड वाहनांना रात्री शहरात प्रवेश
शहरातील सराफ बाजार, मरीमाता मंदिर चौक, आठवडे बाजार भागात जड वाहने दिवसा येत असल्यानेदेखील वाहतूक कोंडी होत असल्याच्या प्रश्‍नावर आराक यांनी यापुढे जड वाहनांना रात्रीच्या वेळी शहरात प्रवेश दिला जाईल या संदर्भात नियोजन केले जाईल, असे सांगत शहरातील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी या संदर्भात बैठक घेवून चर्चा करू, असेही ते म्हणाले.

रीक्षा चालकांसह नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
शहरातील नियमांचे पालन न करणार्‍या रीक्षा चालकांसह दुचाकीला चित्र-विचित्र नंबरप्लेट असलेल्यांवर पदभार घेतल्यापासून धडक कारवाई केली जात असल्याची माहिती आराक यांनी दिली. वाहनधारकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहनही शहरवासीयांना केले. यावेळी भुसावळ शहर वाहतूक शाखेचे नाईक संदीप राजपूत, हवालदार सुनील शिंदे उपस्थित होते.