भुसावळ- विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असतानाही श्री विसर्जन मार्गाची डागडूजी होत नसल्याने भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होती. या संदर्भात दैनिक जनशक्तीने 25 ऑगस्टच्या अंकात ‘श्री विघ्नहर्त्याचा मार्ग खडतर’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून पालिका प्रशासन व सत्ताधार्यांचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल घेत श्री विसर्जन मार्गावरील खड्डे डांबराने बुजवण्यास मंगळवार, 4 पासून प्रारंभ झाल्याने शहरातील वाहनधारकांसह श्री भक्तांमधून समाधान व्यक्त हेात आहे. शहरातील जामनेर रोड, बाजारपेठ, सराफ बाजार, जुना सातारा यास श्रींच्या प्रमुख विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवले जाणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.
वाहनधारकांना दिलासा
शहरातील जामनेर रोड, जळगाव रोड, यावल रोड बसस्थानक रोड व वरणगाव रोड अशा प्रमुख मार्गासह खडका रोड, जवाहरलाल डेअरी मार्ग, मरीमाता मंदीर रोड जाममोहल्ला अशा विविध भागातील मार्ग खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणीवर मात करीत मार्गक्रमण लागत असल्याने वाहनधारक व शहरवासींयामध्ये नाराजी व्यक्त केली होती. काही नगरसेवकांनी खड्डेमय मार्गावर माती मिश्रीत मुरूमाचे ठिगळ तर काही भागात दगड-गोटे टाकून वाहनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नगरपालिका प्रशासनाने दखल घेवून शहरातील प्रमुख मार्गावर खड्डे डांबरीकरणाने दुरूस्ती करण्याची मोहीम मंगळवार पासून हाती घेतल्याने वाहनधारकांमध्ये काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
नागरी वस्ती भागातील मार्गाचीही व्हावी दुरूस्ती
शहरातील मुख्य मार्गाप्रमाणेच नागरी वसाहतीमधील रस्त्यांचीही बिकट अवस्था झाली आहे. यामुळे या भागात मागर्र्क्रमण नागरीकांना अनेक अडचणीचा त्रास सहन करावा लागतो. तर काहींनी खाजगी प्रवाशी रीक्षांने प्रवास करायचा असल्यास रीक्षाधारक खड्डेमय मार्गामुळे अतिरीक्त पैशांची मागणी करीत असल्याने नागरीकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने मुख्य मार्गाप्रमाणेच शहराच्या नागरी वस्तीमधील खड्डेमय मार्गाकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.