भुसावळातील विभागप्रमुखांची प्रांताधिकार्‍यांनी घेतली बैठक

0

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या सूचना ; आज बीएलओंना प्रशिक्षण

भुसावळ- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर तिच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मंगळवारी दुपारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून आढावा घेतला. बैठकीला तहसीलदार महेंद्र पवार, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शासकीय अधिकार्‍यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय मालमत्तांचा राजकीय लोकप्रतिनिधींकडून वापर होणार नाही याबाबत अधिकार्‍यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी, अशी सूचना प्रांताधिकार्‍यांनी करीत मॉडेल कोड ऑफ कंडक्टबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सिंगल विंडो तसेच सुविधा अ‍ॅपबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सिंगल विंडोवर सहाय्यक निरीक्षक दर्जाचा अधिकारी लवकरच तैनात करण्यात येणार असल्याचे प्रांत म्हणाले.

तर दोषींवर गुन्हेही दाखल करा
निवडणुकीसाठी नियुक्त सेक्टर अधिकार्‍यांनी करावयाची कामे तसेच काय काळजी घ्यावी याबाबत प्रांतांनी मार्गदर्शन केले. आचार आचारसंहितेचे उल्लंघण होत असल्यास गुन्हे दाखल करावेत तसेच तक्रारीनंतर लागलीच दखल घ्यावी, अशा सूचना प्रांतांनी केल्या.

आज बीएलओंना प्रशिक्षण
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व तालुक्यातील 350 बीएलओंना प्रभात कॉलनीतील कार्यालयात सकाळी नऊ ते एक व दोन सहा दरम्यान ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार असून हाताळणीबाबत प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनही केले जाणार आहे.