भुसावळातील विवाहिता चारचाकी अपघातात ठार : पतीसह चौघे जखमी 

पिंपळगाव बसवंतजवळ झायलो वाहनाला अपघात

भुसावळ : मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या भुसावळातील दाम्पत्याच्या चारचाकी झायलो वाहनाला नाशिकजवळील पिंपळगाव बसवंत गावाजवळ अपघात झाल्याने या अपघातात 58 वर्षीय विवाहिता जागीच ठार झाली तर विवाहितेच्या पतीसह अन्य चौघे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने भुसावळ शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अरुणा सुनील पाठक (58, सेंट अलॉयसीस शाळा परीसराच्या पाठमागे, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

मुंबईहून परतताना झायलो वाहनाला अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील श्री संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त सुनील पाठक (63) हे पत्नी अरुणा पाठक यांच्या पायावरील उपचारासाठी मुंबई येथील श्री कोकिलाबेन रुग्णालयात वाहन चालक ईरफान शेख व मित्र पिंटू माने व श्याम दरगड (सर्व रा.भुसावळ) यांच्यासोबत निघाले होते. उपचाराचे काम मंगळवारी झाल्यानंतर परतीच्या प्रवासात मंगळवारी रात्री झायलो वाहनाला अज्ञात वाहनाने समोरून डॅश मारल्याने अपघात झाल्याने सुनील पाठक हे वाहनाबाहेर फेकले गेले तर चालक ईरफान शेख हा गंभीर झाला असून त्याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत तर अरुणा पाठक या वाहनाच्या सीटमध्ये समोरून दाबल्या गेल्याने डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील श्याम दरगड यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली तर पिंटू माने यांच्या छातीला जबर मार लागला. जखमींना तातडीने नाशिकच्या काकतकर रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

नाशिकमध्येच होणार अंत्यंस्कारर
पाठक दाम्पत्याची दोन्ही विवाहित मुले हे फ्रॉन्समधील स्थायीक असून त्यांना अपघाताची कल्पना देण्यात आल्यानंतर ते बुधवारी मध्यरात्री नाशिकमध्ये दाखल होणार आहेत तर मयत अरुणा पाठक यांच्या मृतदेहावर गुरुवारी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी आप्तांनी दिली.