भुसावळ : शहरातील दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तब्बल पाच बंद घरांना टार्गेट करीत सुमारे दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. रविवार, 3 जुलै रोजी भर दिवसा झालेल्या धाडसी घरफोड्यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, गत सहा महिन्यांपूर्वी 22 जानेवारी 2022 रोजी शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंटमध्ये चारचाकीतून आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅटमधून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. हा गुन्हा उघडकीस आलेला नसताना व आजच्या घटनेत चोरट्यांनी अशाच पद्धत्तीने घरफोड्या केल्याने त्या घटनेतील व आजचे चोरटे एक तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवाय चोरटे चोरीसाठी चारचाकीने आल्याचा संशय आहे.
एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या
जामनेर रोडवरील ताप्ती पब्लिक स्कूलमागील पियुष कॉलनीत मनोज भास्कर कोल्हे वास्तव्यास असून त्यांचे खडका येथे मेडिकल दुकान आहे. रविवारी दुपारी दोन वाजता ते मंदिरात गेल्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला व सामान अस्ताव्यस्त दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाटातील सुमारे दहा तोळे सोने व पाच हजारांची रोकड, चांदीच्या वस्तू लांबवल्या.
दोन विंगमधील चार घरे फोडली
चोरट्यांनी यानंतर आपला मोर्चा किन्ही रस्त्यावरील साईजीवन फेज- 2 कडे वळवल्या. येथे दोन विंग असून त्यातील ए विंगमधील तीन घरे फोडण्यात आली. फर्निचर व्यावसायीक चंद्रशेखर सीताराम विश्वकर्मा यांच्या घरी कुणी नसताना व कुटूंब नातेवाईकांकडे गेल्याने चोरट्यांनी घरातील चांदीच्या वस्तू, अडीच ते तीन लाखांचे सोने लांबवले तर रोकड सुदैवाने नजरेस पडली नाही. सायंकाळी साडेपाच वाजता चोरी उघडकीस आली. त्यानंतर गोदावरी फाऊंडेशनमध्ये कामाला असलेले गणपत पांडुरंग ठाकूर हे मुलीला सोडण्यासाठी क्लासला गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून पाच हजारांची रोकड, मुलीच्या सोन्याचे कानातले लांबवले तसेच गोपाळ रघुनाथ पाटील यांच्याकडे चोरीचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने घर रीकामे असल्याने काहीही हाती पडले नाही. त्यानंतर बि विंगमधील इलेक्ट्रीशीयन भरत विठ्ठल कोळी हे कामाला गेल्यानंतर व पत्नी बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून एक हजारांची रोकड लांबवली तसेच साहित्याची फेकाफेक केली. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली.
सहा महिन्यांपूर्वीच्या चोरीची आठवण
भुसावळातील बिल्डींग मटेरीयल विक्रेता रघुनाथ चुडामण चौधरी हे शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंंटमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहेत. कुटुंबातील सदस्य देवदर्शनासाठी तर सून घराशेजारी गेल्याची संधी चोरट्यांनी साधून शनिवार, 22 जानेवारी दुपारी 12.30 वाजता चारचाकीतून दाखल होत प्लॅट फोडून सुमारे पाच लाखांचा ऐवज लांबवला होता. विशेष म्हणजे सुटा-बुटातून हे चोरटे दाखल झाले होते तर आजच्या घटनेत चोरट्यांनी चारचाकीचा वापर केला असून सीसीटीव्ही नसलेल्या भागातच आपले काम फत्ते केल्याने चोरटे माहितगार असल्याचा संशय आहे.