भुसावळातील वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसैनिक आक्रमक

भुसावळ : शहरात रविवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर रात्री वीज कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडित करण्यात आला मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर जळगाव रोडवरील जुना सातारा भागातील अनेक कॉलन्यांमध्ये तब्बल आठ तासांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता बी.आर.घोरूडे यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला. वीज गुल होताच तक्रारीसाठीचा हेल्प लाईन मोबाईल लागलीच स्वीच ऑफ केला जात असल्याने याबाबतही संताप व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणी सोमवारी निवेदन देताना करण्यात आली.

खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल
भुसावळ शहरात रविवारी रात्री नऊ वाजेनंतर मुसळधार पावसाला सुरूवात होताच शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे दोन तासानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास काही भागात वीजपुरवठा झाला तर जळगाव रोड भागातील काही नागरीकांकडे पहाटे पाच व सकाळी आठ वाजेदरम्यान वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले. महावितरण वीज कंपनीच्या भुसावळ कार्यालयात संपर्क केला असता, वीजपुरवठा पूर्ववत होण्यास पाच ते सहा तास लागतील असे उत्तर मिळाले नंतर त्यांनीही मोबाईल बंद करून टाकला तर याबाबत महावितरण कंपनीचे अभियंता पद्मे यांच्याशी केला असता त्यांनी फोन उचलला नाही तर महाजन यांनी या भागातील तीन ते चार ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगितले.

नादुरुस्त डीपी तातडीने बदलवा
शहरातील गडकरी नगरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ डीपीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने डीपी बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, भिलवाडी भागात सोमवारी सकाळी आठ वाजता झाडाची फांदी तुटल्याने वीज तार तुटल्याने भिलवाडीतील घरावर पडली. वीज कंपनीचे कर्मचारी मात्र चार तासांनी आले. तोपर्यंत तेथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर थांबले होते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांनी दिला. मोहित नगर व साईबाबा मंदिरजवळ नवीन डीपी व ट्री कटिंगची मागणी शिवसेना शहर उप प्रमुख स्वप्नील सावळे व योगेश बागुल यांनी केली. कंडारी गावातील डीपी बदलण्याची मागणी शिक्षक सेनेचे विनोद गायकवाड यांनी केली.

तर तीव्र आंदोलनाचा इशारा
वीज कंपनीने कामकाजात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबाईत, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, मुकेश गुंजाळ, सोनी ठाकूर, राकेश खरारे, पिंटू भोई, विनोद गायकवाड, कैलास लोखंडे, कडू चौधरी, योगेश बागुल, मनोज पवार, स्वप्नील सावळे, मेहमूद शेख काळू आदींनी दिला. कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे म्हणाले की, वीज पडल्याने तीन इन्सुलेटर फुटल्याने ते बदलवून रात्री अडीच वाजता सप्लाय सुरू करण्यात आला.