भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील 60 वर्षीय बेपत्ता वृद्धेच्या खून प्रकरणी सतना येथून अजीज खाटीक (42, अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) या संशयीतास सोमवारी भुसावळ शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. संशयीत व मयतात अनैतिक संबंध असल्याची शक्यता असून त्याने खून केल्याच्या शक्यतेन पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. शहरातील सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) या गुरुवारपासून बेपत्ता झाल्यानंतर यांचा मृतदेह रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात रविवारी सकाळी आढळला होता. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वृद्धेचे अनैतिक संबंध असल्याच्या शक्यतेनंतर या प्रकरणात अजीज खाटीक यांचे नाव पुढे आले होते तो देखील शहरातून गायब होवून मध्यप्रदेशातील सतना येथे आपल्या सासूकडे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याच्या सोमवारी मुसक्या आवळल्या. दरम्यान, पथक रस्ते मार्गाने येत असून ते मंगळवारी रात्री उशिरा शहरात दाखल होणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले.