महाजनादेश यात्रा ; भाजपातर्फे स्वागताची जय्यत तयारी
भुसावळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळातील डी.एस.ग्राऊंडवर गुरुवारी दुपारी 12 वाजता जाहीर सभा होत असून या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह गुप्ता वार्ता विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी बंदोबस्ताच्या दृष्टीने अधिकार्यांनी नियोजन केले. दरम्यान, भुसावळात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनीही नियोजन केले असून स्वागताचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकावण्यात आले आहे शिवाय सभा स्थळी सुमारे सात हजार नागरीक बसू शकतील या पद्धत्तीचा वॉटर प्रुफ मंडप उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.
अधिकार्यांनी केली पाहणी
मंगळवारी दुपारी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, मुंबई विशेष सुरक्षा विभागाचे निरीक्षक सुरेश कांबळे, सीआयडीचे डीवायएसपी राजेश भागवत, एसआयडीचे निरीक्षक आनंद महाजन, तहसीलदार महेंद्र पवार, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वीज कंपनीचे व्ही.व्ही.पाटील, आर.बी.पद्मे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.वाय.कुरेशी आदींच्या उपस्थितीत बैठक घेवून सभेचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी डी.एस.हायस्कूलच्या सभा स्थळाची पाहणी केली. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री जामनेर मुक्कामी
बोदवड येथून महाजनादेश यात्रा भुसावळात मुक्कामी येणार होती शिवाय मुख्यमंत्रीही भुसावळात मुक्कामी राहून दुसर्या दिवशी पत्रकार परीषद घेवून संवाद साधणार होते मात्र आता मुख्यमंत्री बोदवडमधील स्वागतानंतर थेट जामनेरात मुक्कामी थांबतील व दुसर्या दिवशी गुरुवार, 8 रोजी रोजी सकाळी 10 वाजता सभा जामनेरची सभा आटोपून भुसावळात दुपारी 12 वाजता डी.एस.ग्राऊंडवर सभा घेतील. त्यानंतर एक वाजता जळगावातील सागर पार्कवर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री जिल्ह्यात येत असल्याने महाजनादेश यात्रेच्या मार्गावर पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.