भुसावळातील समता नगरवासीयांना पोलिसांनी घरातच थांबण्याचे केले आवाहन

0

भुसावळ : भुसावळात कोरोनाने धडक दिल्यानंतर शहरवासीयांसह प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. गत महिनाभराच्या काळात भुसावळात एकही कोरोनाबाधीत रुग्ण न सापडल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला असतानाच शहरातील समता नगर परीसरातील 43 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी प्रशासनाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आदींनी समता नगर भागात जावून नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

विविध उपाययोजनांवर भर
शहरातील समता नगर परीसरातील 43 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागातर्फे महिला राहत असलेल्या परीसरात आता सॅनिटायजेशन (निर्जंतुकीरकण) करण्यात येत असून त्या परीसरातील रहिवाशांचा सर्वे करण्यात येणार आहे शिवाय त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेवून त्यांनादेखील उपचारार्थ हलवण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. दरम्यान, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात समता नगर परीसरात राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत नियोजन सुरू होते.

पोलिसांनी केले घरातच थांबण्याचे आवाहन
कोरोनाचा रुग्ण भुसावळात आढळल्यानंतर पोलिसांनी समता नगर परीसरात जावून नागरीकांना घरातच थांबवण्याचे आवाहन केले आहे शिवाय भुसावकरांनीही अत्यावश्यक वेळीच घराबाहेर पडावे व विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे.