भुसावळातील सहा.निरीक्षकांच्या पत्नीची धूम स्टाईल चैन लांबवली

0

शहरात गुन्हेगारी वाढली : चोर्‍या-घरफोड्यांचा तपास एकीकडे शून तर दुसरीकडे अधिकार्‍यांकडे चोरी होताच यंत्रणा कामाला लागून काही तासातच आरोपी जाळ्यात

भुसावळ- शतपावली करण्यासाठी निघालेल्या भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन धूम स्टाईल लांबवण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री शहरातील गजबजलेल्या शांती नगर परीसरात घडल्यानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. चोरट्यांनी थेट अधिकार्‍यांच्या पत्नीची चैन लांबवल्याने शहर पोलिस ठाण्यात यंत्रणेने चोरट्यांचा कसून शोध घेतला तर सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून अवघ्या काही तासात चोरट्यांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले मात्र तक्रार दिल्यास पोलिस खात्यात बदनामी होईल म्हणून गंधाले दाम्पत्याने तक्रार दिली नसल्याचे समजते तर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा चोरट्यांना मात्र मे महिन्यात झालेल्या दुध डेअरीतील चोरीप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एकीकडे सर्वसामान्यांकडे होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांचा वर्षानुवर्षे तपास लागत नसताना अधिकार्‍यांकडे चोरी होताच अवघ्या काही तासात आरोप सापडल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असलेतरी इतरही चोर्‍या-घरफोड्यांचा अशाच पद्धत्तीने तपास लावावा, अशी मागणीही सुज्ञ नागरीक करीत आहेत.

शतपावलीला निघाल्यानंतर चोरट्यांनी साधला डाव
शहरातील शांती नगर परीसरात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले राहतात. बुधवारी सायंकाळी ते पत्नीसह शतपावली करण्यासाठी बाहेर पडले तर ही संधी साधून धूम स्टाईल दोघा चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन काही कळण्याआत लांबवली. या प्रकाराची माहिती शहरात कानोकान पसरतात खळबळ उडाली तर गंधाले यांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परीसरातील सीसीटीव्ही फुटेजसह खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट केल्यानंतर चोरट्यांची माहिती पोलिसांना अवघ्या काही तासात गवसली.

बदनामीपोटी टाळली तक्रार : चोरीच्या गुन्ह्यात केली अटक
शहरात एकीकडे गुन्हेगारीने कळस चढवला असताना दुसरीकडे सहा.निरीक्षकांच्या पत्नीचीच चैन लांबवण्याची हिंमत चोरट्यांची झाल्याने तक्रार दाखल झाल्यास पोलिस खात्याची आणखी बदनामी होईल या भीतीने गंधाले दाम्पत्याने याबाबत तक्रार देणे टाळले तर 11 मे 2015 रोजी शहरतील सहकार नगरातील पत्री शाळेजवळील श्री दुग्धालय फोडण्यात आल्याची घटना घडली होती. हेमंत पुरूषोत्तम किरंगे यांच्या मालकीच्या श्री दुग्धालयातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील साडेआठ हजारांची रोकड लांबवली होती तर या गुन्ह्यात संशयीत आरोपी सोनू रामेश्‍वर पांडे (23, न्यू सातारा, भुसावळ) व सचिन शिवराम वाघ (28, चांदमारी चाळ, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.