केळी उत्पादकांचा पैसे न दिल्याने संताप अनावर : चार जण जखमी
भुसावळ : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा केळी व्यापारी सानिया कादरी यांच्या जामनेर रोडवरील कृष्णकुंज या घरावर मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ऐनपूर परीसरातील महिला व पुरूष केळी उत्पादकांनी हल्ला चढवत घरातील सामानाचे नुकसान केले. या हल्ल्यातील सुरक्षा रक्षकासह घरातील तीन नोकर जखमी झाले. ऐनपूर परीसरातील सुमारे 70 वर शेतकर्यांनी सानिया कादरी यांना केळी विकली आहे. केळी विक्री करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांनी कादरी यांच्याकडे तगादा लावला होता मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकर्यांच्या संयमाचा मंगळवारी बांध सुटला. जामनेर रोडवरील कृष्णकुंज या सानिया यांच्या निवासस्थानी शेतकर्यांनी धडक देत तीन गेटचे कुलूप तोड घरातील फर्निचरसह सामानाची तोडफोड केली. शेतकर्यांचा संताप इतका प्रचंड होता की टीव्ही संचासह खिडक्यांची तावदानेही तोडण्यात आली. शेतकर्यांच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक धीरज ठाकूर याचा हात मोडला तर घरातील नोकर सोहेब, सोहेल व सदु हे जखमी झाले. घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व ईआरटी टीमने घटनास्थळी धाव घेत 20 महिला व पुरूष शेतकर्यांना ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलिसात सानिया यांचे कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले.
काय आहे प्रकरण
सानिया यांनी ऐनपूर परीसरातील सुमारे 70 वर शेतकर्यांकडील केळी खरेदी केली असून ती व्यापारी मयूर खंडेलवाल यांना विक्री केली आहे मात्र या पोटीची दोन कोटी 91 लाखांची रक्कम मिळत नसल्याने ही बाब खंडपीठापर्यंत पोहोचल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
पैसे थकल्याने शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक
भुसावळचे माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचा मुलगा समीर पिंजारी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर सर्वत्र चर्चेत आलेल्या सानिया कादरी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्या केळी व्यवसायात शिरल्याने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या होत्या मात्र कोट्यवधी रुपयांची केळी खरेदी करूनही त्याचे पैसे शेतकर्यांना न मिळाल्याने संघर्षाची ठिणगी उडाली व मंगळवारी शेतकर्यांचा संयम सुटल्याने त्यांनी सानिया यांच्या घरावर हल्लाबोल करीत सामानाची नासधूस केली. या प्रकारात सुरक्षा रक्षकासह चौघे जखमी झाले तर या प्रकरणी अट्रावल येथील 14 महिला व पुरूष शेतकर्यांना अटक करण्यात येऊन सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका झाली.
अन् सानिया अडकली !
सानिया यांनी रावेर तालुक्यातील ऐनपूरसह यावल तालुक्यातील अट्रावल येथील केळी उत्पादक शेतकर्यांकडील लाखो रुपयांची केळी खरेदी करून ती व्यापारी मयूर खंडेलवाल यांना विकल्याची माहिती आहे. यापोटी रक्कम थकल्याने सानिया यांनी मध्यंतरी सावद्यात उपोषण छेडले होते तर या प्रकरणी 28 जुलै 2017 रोजी सानिया यांच्या फिर्यादीनंतर संशयीत आरोपी मयूर खंडेलवाल, कैलास खंडेलवाल व मुनीमजी अन्नी यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत पसार झाले मात्र शेतकर्यांचा पैशांसाठी तगादा वाढल्याने सानियाच्या अडचणीत वाढ झाली.
शेतकर्यांचा संयम सुटला अन् झाली तोडफोड
शेतकर्यांकडील केळी खरेदी केल्यानंतरही त्याची रक्कम अदा करण्यात न आल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सानियाभोवती चकरा मारणार्या शेतकर्यांनी मध्यंतरी भुसावळातही धडक दिली होती मात्र त्यावेळी सामोपचाराने प्रश्न मिटला मात्र मंगळवारी महिला व पुरूष केळी उत्पादक मोठ्या संख्येने जामनेर रोडवरील सानिया यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी धडकले. शेतकर्यांनी सानिया यांच्या घराला लावलेल्या सीसीटीव्ही बाहेर ठेवलेला टीव्ही, खिडक्यांची तावदाने, घराचा दरवाजाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकारात सुरक्षा रक्षक धीरज ठाकूर व राजेश ठाकूर यांच्या हाताला लाकडी दांडा मारण्यात आल्याने दुखापत झाली तर घरातील नोकर सोहेब, सोहेल व सदु हेदेखील किरकोळ जखमी झाले.
पोलिसांची धाव अन् पळापळ
घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, ईआरटी टीमसह बाजारपेठ व तालुका पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना पाहताच शेतकर्यांची धावपळ सुरू झाली तर काहींना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाल्याने रस्त्यावर शेतकरी पुढे व पोलीस मागे, असे चित्रही दिसले.
सानियासह कुटुंबाने घरात कोंडून घेतले
सानिया यांनी यावल व रावेर तालुक्यातील अनेक शेतकर्यांकडील केळी खरेदी केली आहे मात्र त्यापोटीची रक्कम केळी उत्पादकांना न मिळाल्याने शेतकर्यांनी रूद्रावतार धारण करीत सानियाच्या घरावर हल्ला चढवल्यानंतर सानियासह त्यांची आई अफसाना कादरी, बहिण तानिया व अन्य सदस्यांनी एका खोलीत स्वतःला बंद करून घेतले. चार महिन्यांपासून उत्पादकांना पैसे न मिळत नसल्याने ते सानिया यांच्या घराभोवती चक्कर मारत आहे मात्र मंगळवारी संयमांचा बांध सुटला.
अट्रावलच्या शेतकर्यांना अटक
सानिया यांच्या बंगल्याची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांची बहिण तानिया सैय्यदअली कादरी यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून ज्ञानेश्वर पाटील, चेतन ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण महाजन, लिलाधर पाटील, वासुदेव (पूर्ण नाव माहित) यांच्यासह 10 ते 15 महिला व पुरूषांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वासुदेव भालचंद्र चौधरी, प्रवीण नीळकंठ चौधरी, नीळकंठ गोविंदा चौधरी, कांचन प्रवीण महाजन, वंदना अनिल चौधरी, धनश्री दीपक खाचणे, देविदास खाचणे, लिलाधर प्रभाकर पाटील, दीपक छगन खाचणे, माधुरी कमलाकर महाजन, ज्योती देविदास खाचणे, वैशाली वासुदेव चौधरी, रत्ना नीलेश चौधरी (सर्व रा.अट्रावल, ता.यावल) यांना अटक केली.