भुसावळ : भुसावळात 1 ते 3 मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत भाजपाने घेतलेली भूमिका ही सर्वपक्षीय नाही शिवाय शासनातर्फे लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असताना पुन्हा शहर बंद ठेवण्याची गरज नाही व बंदच्या भूमिकेमुळे गुरुवारी नागरीक शहरात मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडल्याने सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे केला. जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरासमोरील नितीन धांडे यांच्या राष्ट्रवादी कार्यालयात गुरुवारी त्यांनी पत्रकार परीषदेत भाजपा पदाधिकार्यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली.
भुसावळकरांना शासनाचे आदेश मान्य : संतोष चौधरी
शासनाने दिलेले प्रत्येक आदेश आम्हाला मान्य आहेत मात्र भाजपा पदाधिकार्यांना शहर बंद करण्याचा अधिकार नाही. भुसावळकरांची गैरसोय होवू नये म्हणून दुध डेअरी, किराणा माल दुकाने व भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले. ज्यांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळावयाचा आहे त्यांनी बंद पाळावा, त्याला विरोध नसल्याचेही चौधरी म्हणाले.
तर 25 जुलैनंतर खेळावे राजकारण
माजी आमदार चौधरी म्हणाले की, ज्यांना राजकारण खेळायचे असेल त्यांनी 25 जुलैनंतर राजकारण खेळावे त्यासाठी आम्हीदेखील तयार आहोत. भुसावळात कोण काम करतेय हे जनतेला ठावूक आहे. भुसावळ तालुक्याचे शासन व प्रशासन मजबूत असून भाजीपाला, फळे, किराणा दुकान, औषध विक्रीची दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून लॉकडाऊनचे भुसावळकर पालन करीत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपाने 1 ते 3 मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र 36 दिवस हे लोक झोपले होते का? लॉकडाऊन 3 मे ला हटणार नाही, ते पुन्हा वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केला. नागरीकांनी लॉकडाऊन पाळावा याबाबत निश्चित दुमत नाही मात्र अत्यावश्यक सेवेसाठी नागरीकांना बाहेर पडावे लागणारच, असेही ते म्हणाले.
आम्ही मदत नव्हे तर ‘कर्तव्य’ बजावतोय
माजी आमदार चौधरी म्हणाले की, साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याचे काम करण्यात आले मात्र काहींच्या पोटात दुखत असल्याने बाजारपेठ पोलिस निरीक्षकांना फोन करण्यास सांगून काम बंद पाडण्यात आले. आतापर्यंत आम्ही सात हजार 249 लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली असून पाच हजार 540 उर्वरीत नागरीकांना मदत करावयाची राहिली आहे, त्यांनादेखील मदत केली जाणार आहे अथवा त्यांच्या खात्यात 500 रुपयांची रक्कम टाकली जाईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी वा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्वपक्षीय बैठक घेवून काही निर्णय घेतल्यास तो आम्ही मान्य करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृउबा सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे उपस्थित होते.