भुसावळातील स्वस्त धान्याचे गार्‍हाणे मुख्यमंत्र्यांकडे

0

ऑपरेटरअभावी ऑनलाईन कामांचा खोळंबा : तहसीलदारांशी चर्चेनंतरही सुटला नाही प्रश्‍न

भुसावळ : 2013 नंतरच्या अनेक रेशन कार्ड धारकांना शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य वाटप करण्यात न आल्याने सर्वसामान्य नागरीकांनी तहसीलदार दीपक धीवरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतरही नागरीकांना पुरवठा विभागाच्या फेर्‍या माराव्या लागल्या मात्र समस्या सुटल्या नसल्याने त्रस्त लाभार्थींना बुधवार, 18 मार्च रोजी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी वराडसीम येथील अक्षय सपकाळे, अमोल वाघ, रुख्मिणी लोहार, चित्राबाई गायकवाड, शांताराम मोरे, कुर्‍हा येथील सचिन भामरे, भुसावळचे नरेश चत्रत, प्रशांत तावडे, लता चौधरी, आशाबाई निळे, लखन चौधरी यांनी प्रा.धिरज पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. विशाल ठोके, संजय भोई, शंतनू पाथरवट, किशोर भोई, अमोल पाटील हे उपस्थित होते. यावेळी 2013 नंतर नवीन रेशनकार्ड काढलेल्या लोकांना रेशनचा माल मिळत नाही तसेच गेल्या सात-आठ वर्षात नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळाले नसल्याने समस्या सोडवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.

डेटा एन्ट्री ऑपरेटर अनुपस्थित
ऑनलाईन नावे फिड करणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर नेहमीच अनुपस्थित असल्याने ऑनलाईनची कामे पूर्ण झालेली नाही. जळगाव विभागावरून नियुक्ती झालेले कर्मचारी उपस्थित नसतात, त्यांना सहा महिन्यांचा पगार दिलेला नसून या विभागात तीन जागा रीक्त आहेत, असे प्राथमिक माहिती मिळाली. एकाच नायब तहसीलदारांकडे दोन अतिरिक्त टेबल असून 121 दुकानाचा कामाचा ताण पडतोय, अशी माहिती मिळाली. या सर्व प्रकारचा त्रास मात्र नागरीकांना होत असून रोजंंदारी कामे सोडून तहसील कार्यालय ते रेशनिंग दुकानाच्या फेर्‍या माराव्या लागतात, अशी नागरीकांची तक्रार आहे.

न्यायासाठी आंदोलन छेडणार -प्रा.धीरज पाटील
पात्र रेशनकार्ड धारकांच्या न्याय व हक्कासाठी व्यापक स्वरूपात आंदोलन उभे करण्यात येईल, नागरीकांनी शिवसैनिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून या सर्व बाबींवर त्वरीत कार्यवाही होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदनाची प्रत पाठवली असल्याचे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.

कोरोनामुळे धान्य न देण्याची अफवा
कोरोना विषाणू मुळे बोटाचे थंब घेतले जात नाही म्हणून धान्य मिळणार नाही, अशी अफवा पसरवून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केली जाते आहे परंतु फक्त धान्य दुकानदाराच्या थंब घेऊन नागरीकांना धान्य दिले जाईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.