भुसावळातील हुडको कॉलनीतील लोंबकळणार्‍या वीज तारांची दुरुस्ती करा

भुसावळ : शहरातील जळगाव रोड विभागातील हुडको कॉललनी परीसरात साधारण सहा फुटाच्या उंचीवर वीज तारा खाली आल्या आहेत. या ठिकाणाहून रहदारी करणे अगदी धोकेदायक झाले असून नुकताच एक अपघात होवून त्यात युवकाचा उजवा हात निकामी झाला होता. वादळी पाऊस आला की नागरीकांना जीव मुठीत धरून विजेच्या तारांपासून दूर रहावे लागते. आजही या भागात अनेक ठिकाणी कलंडलेले पोल व लोंबकळणार्‍या तारा असे धोकेदायक चित्र दिसत आहेत. या ठिकाणी त्वरीत दुरुस्ती व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे यांच्याकडे केली आहे.

मान्सूनपूर्व तयारीचा नुसताच फार्स
मान्सूनपूर्व तयारीचा नुसता फार्स म्हणावा, अशी महावितरणची सद्यस्थिती आहे. मान्सूनपूर्व तयारीचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ पाच टक्के शिल्लक राहिले, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे परंतु त्याला दुजोरा मिळावा, अशी वस्तुस्थिती नाही. रस्त्यावरील लोंबकळणार्‍या वीज तारा नागरीरकांसाठी धोकादायक असे म्हणायची वेळ आली आहे.

झालेल्या कामांची चौकशीची गरज
पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. त्यासाठी स्वतंत्ररीत्या खाजगी यंत्रणाही नियुक्त केली जाते परंतु या यंत्रणेकडून खरेच कामे करुन घेतली जातात की नाही, याबद्दल शंका आहे. विद्युत खांबांवरील तारांना अडथळा ठरणार्‍या झाडाच्या फांद्या कापणे, लोंबकळणार्‍या तारांना सुस्थितीत आणणे, वाकलेले खांब दुरुस्त करणे, खांबावरून दिलेल्या कनेक्शनचे वायर सुस्थितीत आणणे, खांबावरील डीबाला झाकणे बसवणे, ज्या ठिकाणी धोका आहे, अशा खांबांवरील बॉक्सवर तसे लिहिणे आदी कामे या प्रकारात मोडतात मात्र यापैकी बहुतेक कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. हे वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरुन लक्षात येते. ही समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.