भुसावळातील 13 स्वस्त धान्य दुकानांचे निलंबन

0

जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईने दुकानदारांमध्ये खळबळ

भुसावळ– शहरातील स्वस्त धान्य दुकानांबाबत तक्रारी वाढल्यानंतर डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकार्‍यांनी एकाच दिवशी सर्व दुकानांची तपासणी मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाभरातील सर्वच ठिकाणच्या तहसीलदारांसह पथकाने 30 नोव्हेंबर रोजी तपासणी केल्यानंतर अनेक ठिकाणी त्रृटी आढळल्या होत्या तर अनेक दुकाने बंद आढळली होती. या विषयाची गांभीर्याने दखल घेत भुसावळातील 13 दुकानांच्या निलंबनाचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी बुधवारी आदेश काढले. या वृत्तास जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधवर यांनी दुजोरा दिला.

तपासणीत त्रृटी आढळल्याने कारवाई
सात उपजिल्हाधिकार्‍यांसह 20 तहसीलदारांनी भुसावळात 57 दुकानांची 30 नोव्हेंबर 2017 रोजी तपासणी करीत अहवाल दिला होता. दहा स्वस्त धान्य दुकाने बंद आढळली तर तब्बल 24 दुकाने अकार्यन्वित असल्याची व ती नियमबाह्यपणे अन्य दुकानांना जोडण्याची बाब उघड झाल्यानंतर धान्य दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत 13 स्वस्त धान्य दुकानांचे निलंबन केले. शुक्रवारीदेखील काही दुकानांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.