161 अतिक्रमित घरांना पोलिसांनी बजावली नोटीस
भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणार्या 161 रहिवाशांना पोलिसांनी गुरूवारी तसेच शुक्रवारी नोटीस बजावली असून जागा तत्काळ रीकामी करावी, अशी सूचना करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी डीआरएम आर.के.यादव यांनी त्यांच्या दालनात अतिक्रमित जागेबाबत डीवायएसपी गजानन राठोड यांच्याशी चर्चा केली. 15 बंगला भागातील रेल्वेच्या जागेवर 161 जणांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे ही जागा मोकळी करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, रेल्वेचे मंडळ अभियंता एम.एस.तोमर यांनी पंधरा बंगला भागात जाऊन शुक्रवारी जागेची पाहणी केली. पाहणीनंतर डीआरएम कार्यालयात डीआरएम यादव यांच्या दालनात अतिक्रमण काढण्याबाबत बैठक झाली.